चिंचवड, १६ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-निवडणूक काळात जो उमेदवार तुमचं भविष्य बदलू शकतो, नशीब बदलू शकतो, तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो, अशा उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात तर तुमच्या सर्व समस्या नक्कीच मार्गी लागतील. आणि या सर्व गोष्टी पूर्णत्वास नेण्याची क्षमता शंकर जगताप यांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही जगताप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, त्यांच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न, वाहतुकीच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंचवडकरांना आवाहन केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा भूमकर चौक, वाकड येथील द्रौपदा लॉन्स मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सभेला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, जगातील सर्वात वेगाने शहरीकरण आणि औद्योगिकरण होणारे पिंपरी चिंचवड शहर आहे. या शहरीकरणाचा आणि औद्योगिकरणाचा ताण मूलभूत सोयी सुविधांवर पडतो. त्याचाच परिणाम म्हणजे शहरातील वाढती वाहतूक कोंडीची समस्या ही आहे. मात्र या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आपण पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात एलिव्हेटेड रस्ते निर्मितीवर भर दिला आहे.
त्यामाध्यमातून आपण रावेत ते हडपसर या मार्गावर 5 हजार कोटी रुपयांच्या कामाचा डीपीआर तयार केला आहे. त्याचबरोबर रावेत ते नऱ्हे मार्गावर 4 हजार कोटी रुपयांचा डीपीआर, रावेत ते कात्रजपर्यंत 5 हजार कोटी रुपयांचा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासाठी 7 हजार कोटी रुपयांची तरतूद आपण एलिव्हेटेड रस्त्यांसाठी केलेली आहे. या रस्त्यांमुळे पिंपरी चिंचवड शहरावर पडणारा वाहतुकीचा भार कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी काळात पुणे जिल्ह्यात 1 लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मार्गी लागतील ज्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर वाहतूक कोंडी मुक्त शहर होईल असे आश्वासन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
यावेळी गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार शरद ढमाले, भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, शंकर मांडेकर, माजी नगरसेवक शीतल शिंदे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर , माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक बाबा त्रिभुवन, आरपीआय आठवले गटाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कुणाल व्हावळकर, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, सचिन साठे, विशाल कलाटे, स्नेहा कलाटे, राम वाकडकर यांच्यासह मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलू शकत नाही; कोणाला बदलू देणार नाही’
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि विरोधकांनी देशात भाजपविरोधात संविधान बदलाचा फेक नरेटिव्ह पसरवला. मात्र भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या तत्वावर चालणारा पक्ष आहे. याउलट काँग्रेस पक्षानेच त्यांच्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात वारंवार संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला. याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी काळात आणीबाणी लादून जनतेच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे पाप काँग्रेसने केले. त्यामुळे ज्यांनी संविधान तोडण्याचे काम केले, तेच आज संविधान रक्षक असल्याचा आव आणत आहेत. त्यामुळे देशात जातीयवाद पेरणाऱ्या महाविकास आघाडीच्या या खोट्या अपप्रचाराला बळी पडू नका. कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणी बदलू शकत नाही आणि आम्ही ते कोणाला बदलूही देणार नाही, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे 60 वर्षात देशाचे अतोनात नुकसान – नितीन गडकरी
आपल्या देशात पैशाची कमतरता नाही मात्र इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे. याचाच दुष्परिणाम आपल्या देशाने काँग्रेस सरकारच्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात भोगले. काँग्रेसने देशाचे नेतृत्व न करता देशाचे व्यापारी होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘ज्या देशाचा राजा व्यापारी; त्या देशाची प्रजा भिकारी’ अशी अवस्था आपल्या देशाची झाली होती. मात्र २०१४ साली देशाच्या जनतेने योग्य पक्ष, योग्य नीती आणि योग्य नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत देशात सत्तापालट केला. आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात विकासाची गंगा आली. त्यामुळे आजच्या या देशाच्या विकासाचे संपूर्ण श्रेय हे देशातील सर्व जनतेला आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची ओळख ही विकसनशील मतदारसंघ म्हणून आहे. 2009 पासून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगिकरण झाले. या वाढत्या लोकसंख्येमुळे या मतदारसंघात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. मात्र स्व. लक्ष्मणभाऊंनी केंद्र शासन, राज्यातील महायुती सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या माध्यमातून या प्रभागात अनेक विकासकामे करून या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर यांसह रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. यापुढील काळात मतदारसंघातील पाणी, वाहतूक कोंडी, प्रदूषण या काही प्रमुख समस्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावून आपला चिंचवड विधानसभा मतदारसंघ विकसित मतदारसंघ म्हणून नावारूपास आणण्याचे काम मी करणार आहे.
– शंकर जगताप
(महायुतीचे उमेदवार)