Home ताज्या बातम्या अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या अडचणीत वाढ,मावळातील महिला पत्रकार धमकी प्रकरणी राज्य...

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या अडचणीत वाढ,मावळातील महिला पत्रकार धमकी प्रकरणी राज्य महिला आयोगाने मागवला पोलिसांकडे अहवाल

0

मावळ,दि. १५ नोव्हेंबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):-लोणावळा येथे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला अपक्ष उमेदवाराच्या नातेवाईकाकडून धमकी प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत.

लोणावळा येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके व महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार फेरी दरम्यान दोघांच्या समर्थकांमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, संदीप भेगडे व अन्य दोन सहकाऱ्यांनी धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. यासंदर्भात संबंधित महिला पत्रकाराने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्याची गंभीर दखल घेत चाकणकर यांनी पोलीस खात्याला सूचना केल्या आहेत.

महिला पत्रकार धमकी प्रकरणी किशोर भेगडे, संदीप भेगडे यांच्यासह चौघांविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तातडीने या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग आणि पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत सखोल चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास तातडीने पाठविण्यात यावा अशी सूचना देण्यात आली आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतील महिलांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. राजकीय नेत्यांनी महिलांबाबत बोलताना, वागताना चुकीचे कृत्य केल्यास त्या विरोधात कडक कारवाई होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − four =

error: Content is protected !!
Exit mobile version