पिंपरी,दि. २४ ऑक्टोबर २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मागील अकरा वर्षांपासून निवडणूक काळात देशभर जाती – धर्मात तेढ निर्माण करीत, धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांसह सर्व छोट्या सामाजिक घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आगामी विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत घेण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली.
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेच्या वतीने बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बिशप सॅम्युअल साखरपेरकर, पास्टर नितीन काळे, शौल विश्वास कांबळे आदींसह विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विकासात पिंपरी चिंचवड कामगार नगरीचे उल्लेखनीय योगदान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी राखीव मतदार संघातून नवीन, सुशिक्षित युवकाला संधी मिळावी अशी मागणी या सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत करण्यात आली. यामध्ये पैलवान दीपक सौदागर रोकडे या सुशिक्षित व स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या उमेदवाराला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
पैलवान दीपक रोकडे हे विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट, महिला बचत गट यांच्याशी उत्तम समन्वय व संपर्क साधून आहेत. युवकांमध्ये सामाजिक प्रबोधन व्हावे त्यांनी व्यसनापासून दूर राहावे, यासाठी रोकडे यांनी डॉ. अनिल अवचट यांच्या संस्थेच्या माध्यमातून पिंपरी, आकुर्डीतील विविध महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती, जनजागृती शिबिर आयोजित केली आहेत. आपले सण, उत्सव, संस्कृती याची जपवणूक व्हावी व बालवयातच याविषयी विद्यार्थ्यांवर संस्कार घडावेत, म्हणून विविध शाळांमधून बालसंस्कार शिबिरे, किल्ले बनवा स्पर्धा असे उपक्रम शिव वंदना ग्रुपच्या वतीने आयोजित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच फुले, शाहू, आंबेडकर जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन रोकडे यांनी केले आहे. भारत विकास परिषदेच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच शिवकालीन मर्दानी खेळांना प्रोत्साहन देत युवक, युवतीचे सक्षमीकरण करीत समाज प्रबोधन करण्याचे उपक्रम देखील त्यांनी राबवले आहेत. महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी या उद्देशाने महिला बचत गटांना सण, उत्सव काळात विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देऊन त्यांना मदत व प्रोत्साहन दिले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा उत्तम संपर्क आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन बलिदान दिनानिमित्त वढू बुद्रुक, तुळापूर ते पिंपरी पर्यंत शक्ती शौर्य ज्योत यात्रा काढून त्यांनी युवक संघटन उभारले आहे. शिवजयंती, तथागत गौतम बुद्ध जयंती ते महात्मा जोतीराव फुले जयंती या काळात नवभारत युवक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत.
पैलवान दीपक सौदागर रोकडे हे बूस्ट एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच निसर्गधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष आहेत. दीपक रोकडे यांची जन्मभूमी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर असून कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे. स्वच्छ चारित्र्य आणि आश्वासक नेतृत्व म्हणून उच्चशिक्षित दीपक रोकडे यांना महाविकास आघाडीने पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असे आवाहन खासदार शरदचंद्र पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.