लातूर-उदगीर येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचे भूमिपूजन
उदगीर, दि.25 ऑगस्ट 2024(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्टी संस्था स्थापन करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातही समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर शहरातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. आमदार अमित गोरखे, सचिन साठे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सुंदर बोंदर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, बन्सीलाल कांबळे, अंबादास सगट यांच्यासह पदाधिकारी, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ना. संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांचे फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत करण्यात आले. ना. बनसोडे यांच्या हस्ते कुदळ मारून इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून या इमारतीसाठी 14 कोटी 96 लाख रुपये निधी उदगीर नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था असलेल्या या इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका असणार आहे.
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चिराग नगरमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरात वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक होणार असून लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
उदगीर शहरात अतिशय मोक्याच्या जागेवर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीची उभारणी होत आहे. याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आणखी 50 लाख रुपये निधी दिला जाईल, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि भव्य सभागृह उभारण्यात आले आहे. उदगीर शहरात विविध ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज भवन उभारण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पुढील काळात ही रक्कम दुप्पट करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन मातंग समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. बार्टीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या आर्टी संस्थेमुळे मातंग समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा, संशोधनासाठी मदत होवून समाजाचा विकास होईल, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्य, कष्टकरी माणसाचे जीवन रेखाटले. या समाजाच्या विकासाबाबत चिंतन करून साहित्य निर्मिती केली. त्यांचे विचार प्रत्येकाने समजून घेवून कोणताही जातीभेद न मानता समाजासाठी काम करावे, असे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यावेळी म्हणाले.
प्रा. अंबादास सगट, रामचंद्र तिरुके, बन्सीलाल कांबळे, पप्पू गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंडीत सूर्यवंशी यांनी केले, शिवाजी देवताळे यांनी सूत्रसंचालन केले.
Post Views: 103