Home ताज्या बातम्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

0

पुणे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत,असे निर्देश केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील,  जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

श्री. मोहोळ म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पूरबाधित क्षेत्रातील स्थलांतरित नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पूरविण्यात याव्यात. या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. याकरिता पुरेसे मनुष्यबळ वाढवावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले उपलब्ध करून द्यावेत.धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांना कळवावे, जेणेकरुन त्यासूचना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. नदीपात्रावरील गावातील नागरिकांना स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून धरणातील पाणी विसर्गाबाबत सूचना द्याव्यात. शहरातील पूरबाधित भागात सीसीटीव्ही यंत्रणा कायान्वित करण्यात यावी. महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा.  पुणे शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती भविष्यात उद्भवणार नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी,असेही श्री. मोहोळ म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, पूरबाधित भागात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. तसेच या भागांतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.बैठकीस उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी धरणातील पाणीसाठा, विसर्गाबाबत वेळोवेळी अद्ययावत सूचना, पूरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करुन बाधित नागरिकांना मदत, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, नदीपात्रातील भराव काढणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या.डॉ. पुलकुंडवार म्हणाले, भारतीय हवामान खाते आणि कृषी विभागाच्या स्कायमेट यंत्रणेकडून येणाऱ्या पर्जन्यमानाच्या अंदाजाच्या सूक्ष्म निरीक्षणाकरिता पुणे महानगरपालिकेने एक स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. जलसंपदा विभागाने धरणातील येवा तसेच धरणातून करण्यात येणारा पाण्याच्या विसर्गाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक यंत्रणांना संदेश व दूरध्वनी, इमेलद्वारे कळवावे, त्याची नोंदही घेण्यात यावी. पूरबाधित झालेल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत करण्याची करावी. विशेष मदतीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही डॉ. पुलकुंडवार म्हणाले.

डॉ. दिवसे म्हणाले, पूरबाधित परिसरातील नागरिकांना मदतकार्य सुरू असून बाधित क्षेत्रातील सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना जेवण, नाश्ता, ब्लॅंकेट आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुणे शहर व हवेलीचे उप विभागीय अधिकारी यांच्या मदतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  पंचनामे पूर्ण होताच मदतीसाठीचे प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. अतिवृष्टीच्या काळात मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीकरिता प्रस्तावाकरिता सादर करण्यात येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली.श्री. अमितेश कुमार आणि डॉ. भोसले यांनी पुणे शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित भागात करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत माहिती दिली.जलसंपदा विभागाचे श्री. कपोले आणि श्री. गुणाले यांनी धरणक्षेत्रातील पाण्याच्या स्थिती, धरणातील येव्याच्या मोजमापाबाबत माहिती दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − 5 =

error: Content is protected !!
Exit mobile version