पिंपरी, दि. ८ जून २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बालवाडी शिक्षिका तसेच सेविका यांना १० टक्के मानधन वाढवून देण्यास आज प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना
प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर
पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी
उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी लेखा विभागामध्ये २
सेवानिवृत्त कर्मचारी मानधनावर नियुक्ती करण्यासाठी तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती
रुग्णालयाच्या सेंट्रल गॅस प्लँटच्या निखळलेल्या पाईपलाईन दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास
बैठकीत मान्यता देण्यात आली.
तसेच वैद्यकीय विभागाकडील नवीन ४ रुग्णालय व वायसीएममधील नवजात शिशु
विभागाकरीता निओनेटल व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी तसेच शहरात ठिकठिकाणी बोअरवेल
घेणे, जुन्या बोअरवेलची देखभाल दुरूस्ती करणे, स्थापत्य विषयक कामे करणे, ठिकठिकाणी
सुशोभिकरण करणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे, नवीन कुपनलिका करणे, पाईपलाईन
टाकणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, ठिकठिकाणी वॉल्व बसविणे, जलवाहिन्या
टाकण्याकरिता खोदण्यात आलेल्या ट्रेंचेसचे डांबरीकरण करणे आदी कामांसाठी येणाऱ्या खर्चास
प्रशासक शेखर सिंह यांनी आज बैठकीत मान्यता दिली.