हडपसर, दि. २६ डिसेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना, रेल्वेफाटकावरील उड्डाणपुल, मुळा मुठा नदी वरील पुलांच्या विविध विकास कामांची पाहणी केली.
यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले की, मांजरी बु. परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी. आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी. महानगरपालिकेने या योजनेचे उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करुन या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी.
हडपसर मांजरी रस्त्यावरील मांजरी बु. येथे रेल्वे फाटकावरील उड्डाणपुल बांधकामासाठी दोन्ही बाजूस लागणारी ५० मीटर जमीन भुसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा. या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. या पुलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना नियमानुसार योग्य तो मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येईल. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी पुलाच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.
मांजरी बु. आणि मांजरी खु. यांना जोडण्यासाठी मुळा मुठा नदीवर दोनपदरी पुलाचे काम सुरु आहे. वाहतूक कोंडीचा विचार करता या पुलाला समांतर चौपदरी पूल बांधण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.विकास कामाच्या पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते ससाणेनगर येथील सावित्रीबाई फुले आयुष्मान आरोग्यवर्धनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.