चिंचवड,०१ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड मधील अनेक खेळाडूनी आतापर्यत क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली आहे. शहरामध्ये अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. त्या खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या शहराची ओळख सातासमुद्रापार घेवून गेले आहेत. त्यामुळे उद्योगनगरी असणारे आपले शहर भविष्यात खेळाडुंसाठी अद्यायावत ‘क्रीडानगरी’ होईल, असा विश्वास भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
‘सेव्हन ओशन’ पैकी चार ‘ओशन’ जलतरणद्वारे पार करणाऱ्या सागर किशोर कांबळे याला राज्य सरकारतर्फे ‘शिवछत्रपती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सागर कांबळे यांची भेट घेतली. तसेच, त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोहन समितीचे सदस्य काळूराम नढे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला क्रीडा अकादमीचे अध्यक्ष माऊली जगताप तसेच कांबळे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सागर कांबळे यांने जलतरण करताना जगतातील ‘सेव्हन ओशन’ पार करण्याचे ध्येय ठेवले आहे. बंगालची खाडी, इंग्लिश खाडी, कॅटरिना खाडी, दक्षिण आफ्रिकेतील खाडी अशा चार खाड्या पार केल्या असून आगामी काळात सागरच्या वतीने तीन खाड्या पार करण्यात येणार आहेत. या खड्या पार करण्यासाठी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत सागरने यशाला गवसणी घातली. हिंमत आणि कष्टाच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते याचीच प्रचिती यातून झाली. त्याचे यश सर्व युवकांना प्रेरणा देणारे आहे. शहरातून अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव लौकिक करत आहेत. औद्योगिक आणि आयटी हब अशी ओळख असणारी आपली नगरी आता शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातदेखील अग्रेसर होत आहे. शहरातील खेळाडूंनी आपापल्या आवडत्या खेळात सहभाग घेऊन उत्तुंग यश मिळवावे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहर हे एक शिक्षण आणि क्रीडानगरी म्हणून ओळखली जाईल असा मला विश्वास आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.