नागपूर ,दि. ५ जुलै २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठातील काही विकास कामे निविदा न करता केली असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न होत असल्याचा अहवाल अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांनी दिला आहे.
त्यामुळे आता कुलगुरू डॉ. चौधरींवर कठोर कारवाई करा, अशी तक्रार आमदार प्रवीण दटके व भाजप पदाधिकारी यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली आहे. दुसरीकडे अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनीही कुलगुरूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर समितीने डॉ. चौधरी यांना दोषी ठरवले होते. परीक्षेच्या कामासाठी एमकेसीएलची निवड करण्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. या कंपनीला २०२२ मध्ये ब्लॅक लिस्टेड करण्यात आले असताना कुलगुरुंनी निविदा प्रक्रिया एमकेसीएलला सहाय्यभूत करून परीक्षेची जबाबदारी दिल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले. तसेच विनानिविदा बांधकांचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. मात्र यानंतरही शासनाने कुलगुरूंवर कुठलीही कारवाई केलेली नाही.
विद्यापीठाच्यावतीने विविध विकास कामे करण्यात आली. हे करताना कंत्राट न काढता एकाच व्यक्तिला कामे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. आता यावरही समितीने अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आला आहे. एकाच कंत्राटदारास दुसऱ्या इमारतीमधील काम विनानिविदा देण्यात आलेले आहेत. सदर वित्तीय अनियमिततेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकची चौकशी होऊन संबंधीताविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी आपला अहवाल सादर केला असून यानुसार सदरहू कामे निविदा कार्यवाही न करता केली असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न होत असल्याचा शेरा दिला आहे. त्यामुळे अशा कुलगुरूंवर विद्यापीठाने कठोर कारवाई करावी अशी मागणी दटके यांनी पत्रात केली आहे. या पत्रावर माजी महापाैर संदीप जाेशींसह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे नेमण्यात आलेल्या समितीने व त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूंनी निविदा न काढता लाखो रुपयाचे कंत्राट दिले हे स्पष्ट झाले. विद्यापीठाच्या अनेक कामात अनियमितता झाल्याचे दिसत असून यामुळे विद्यापीठाची बदनामी झाली आहे. यासाठी कुलगुरूंवर कारवाई करण्यात यावी व अनेक प्रकरणात विद्यापीठाचे आर्थिक नुकसान झाले ते कुलगुरूंकडून वसूल करावे.
-ॲड. मनमोहन वाजपेयी, अधिसभा सदस्य.