तळेगाव दाभाडे,दि.१३ मे २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके व त्यांचे बंधू सुधाकर शेळके तसेच इतर पाच जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा. रजि. क्र.२३३/२०२३भादवि कलम ३०२,१२० ब भारतीय हत्यार कायदा ३/२५,४/२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ सह क्रिमिनल लॉ अमेंन्टमेंन्ट कलम ७ अनन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवार दिनांक दुपारी १.४० वा. तळेगाव दाभाडे नगरपरिषदे समोर निर्घुन पणे हत्या करण्यात आली.आरोपी आमदार सुनील शेळके आमदारांचे बंधू सुधाकर शेळके संदीप गराडे, श्याम निगडकर (राहणार तळेगाव दाभाडे) आणि श्याम यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते. जनसेवा विकास सेवा आघाडीच्या माध्यमातून ते तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनील शेळके,त्यांचे सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात सतत वाद होत असत. मागील सहा महिन्यापासून किशोर आवारे यांनी आमदार सुनील शेळके त्यांचे बंधू सुधाकर शेळके संदीप दराडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांच्या आईला सांगितले होते.१५ सप्टेंबर २०२२ रोजी फिर्यादी यांच्या वाहन चालकाला तो फिर्यादी यांच्यासोबत असल्याने सुधाकर शेळके आणि त्यांच्या साथीदाराने जातिवाचक शिविगाळ केली होती. किशोर आवरे हे त्यांचा मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नव्हती. संतोष शेळके यांना किशोर आवारे सतत मदत करत असत. म्हणून सुनील शेळके आवारे यांच्यावर चिडून होते,असे फिर्यादीत म्हटले आहे. किशोर आवारे यांनी मागील दोन वर्षापासून स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय क्ष देत विरोध केला. चुकीच्या कामाबाबत वेळोवेळी निदर्शने केली. या रागातून तसेच किशोर आवारे यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार सुनील शेळके यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाल्याने कटकारस्थान रचुन मुलाला ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले होते. तेथे श्याम निगडकर आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्याच्या साह्याने (धारदार शस्त्राने) वार करून आवारेनां ठार मारले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.माञ आमदार सुनिल शेळके यांची कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.आमदार सुनील शेळके जनते समोर येऊन त्यांचे म्हणणे मांडतील का? शेळके काय मत मांडतील काय बोलतील याकडे संपुर्ण मावळ तालुक्याचे नव्हे तर जिल्हाचे लक्ष लागुन आहे.जर त्यांचा या प्रकरणाशी संबध असल्यास नैतिक जबाबदारी म्हणुन ते आपल्या आमदरकी पदाचा राजीनामा देतील का?अशा अनेक चर्चाना तालुक्यात शहरात उधान आले आहे.