Home ताज्या बातम्या विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम...

विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

नागपूर, दि.०१ डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राज्यात अनेक ठिकाणी तरुणी, महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाची तक्रार प्रकरणाबाबत व सेफ कॅंपसबाबत अनेक सूचना व निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे बैठक झाली.

या बैठकीस नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव किशोर जकाते, उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासकीय अधिकारी सुयश दुसाने, स्त्री अभ्यास केंद्राच्या धम्मसंगिनी रमा गोरख आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, विशाखा समितीच्या बैठका विद्यापीठात व महाविद्यालयात नियमित झाल्या पाहिजेत. या बैठकीतील प्राप्त तक्रारींचा आढावा दर महिन्याला घेण्यात यावा. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी असली पाहिजे. तक्रार पेटी प्रत्येक महाविद्यालयात व विद्यापीठात ठेवली आहे की नाही याबाबत अहवाल मागवावा.

विद्यापीठातील महिला अध्ययन केंद्रात महिलांच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, किती तक्रारी निकाली निघाल्या, किती तक्रारी प्रलंबित आहेत याबाबत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. विद्यापीठे व महाविद्यालये परिसरात विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या तक्रारींचा निपटारा तात्काळ झाला पाहिजे. यासाठी आवश्कतेनुसार कायदे सहायकाची नेमणूक करण्यात यावी. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना घडतात या घटनांच्या तक्रारीची पोलीस स्टेशनमध्ये नोंद होते. या तक्रारीचा राज्यस्तरीय डाटा बेस एकत्रित असणे आवश्यक आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबाबतीत नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे. विद्यापीठ व महाविद्यालयातील अत्याचाराच्या घटनांबाबत राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थित लवकरच घेण्यात येईल. या बैठकीत राज्यातील महिलांविषयी अत्याचाराच्या तक्रारीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + 19 =

error: Content is protected !!
Exit mobile version