Home ताज्या बातम्या रिपब्लिकन मातंग समाज आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत साठे यांच्या निधनाने बौद्ध...

रिपब्लिकन मातंग समाज आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत साठे यांच्या निधनाने बौद्ध आणि मातंग समाजाला जोडणारा सुवर्णमध्य हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

पुणे दि.१४ सप्टेबंर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रिपब्लिकन पक्षाच्या मातंग समाज आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हनुमंत साठे यांच्या निधनाने बौद्ध आणि मातंग समाजाला जोडणारा सुवर्णमध्य हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत हनुमंत साठे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मातंग समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक परिवर्तनाचा विचार सांगत मातंग समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन चळवळीला वाहिलेले हनुमंत साठे हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निष्ठवंत समर्थक अत्यंत विश्वासू नेते होते. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी चे असणारे हनुमंत साठे पुणे येथे स्थायीक होते. काही दिवस ते रुग्णालयात हृद्यविकारामुळे दाखल होते. त्यात ते बरे झाले आणि पुन्हा हातांच्या बोटांना गँगरीन झाल्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यात ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांचे काल दि.१३ सप्टेंबर रोजी रात्री वयाच्या ५९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा विरेन साठे असा परिवार आहे.

आज दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी ५ . ३० वाजता पुण्यातील धनकवडी येथील स्मशानभूमी मध्ये दिवंगत हनुमंत साठे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मातंग समाजाचा बुलंद आवाज असणारे रिपब्लिकन पक्षाची मुलूखमैदानी तोफ असणारे नेते हनुमंत साठे यांचे निधन झाल्याचे कळताच ना.रामदास आठवले यांनी आपले दि.१४ सप्टेंबर चे सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीतुन थेट पुणे गाठले. दुपारी ३.३० वाजता पुणे विमानतळावर पोहोचल्या नंतर ना.रामदास आठवले यांनी दिवंगत हनुमंत साठे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दिवंगत हनुमंत साठे यांच्या अंत्ययात्रेत उपस्थित राहिले. दिवंगत हनुमंत साठे यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी धनकवडी येथील स्मशानभूमी येथे ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर; मातंग समाजाचे राज्य भरातील कार्यकर्ते; रिपब्लिकन पक्षाचे राज्य भरातील कार्यकर्ते असे शेकडो लोकांच्या उपस्थितीत दिवंगत हनुमंत साठे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

दिवंगत हनुमंत साठे यांचे मातंग समाजासाठी मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी आयुष्यभर मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अग्रक्रमाने काम केले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर अतूट विश्वास ठेवून त्यांनी आयुष्यभर रिपब्लिकन चळवळीत स्वतःला वाहून घेतले. ना.रामदास आठवले यांचे नेतृत्व मातंग समाजात पोहोचविण्यासाठी त्यांनी निष्ठेने साथ दिली. दलित ; बौद्ध आणि मातंग समाजाला आंबेडकरी विचारधारेच्या धाग्यात जोडण्याचे काम दिवंगत हनुमंत साठे यांनी केले. त्यांचे वक्तृत्व ज्वलंत होते. रिपब्लिकन पक्षाची मुलुख मैदानी तोफ ठरलेले हनुमंत साठे यांचे शब्द म्हणजे फुले शाहू आंबेडकरी आणि अण्णा भाऊ साठे; लहुजी वस्ताद यांच्या विचारांचे क्रांतीचे निखारे होते. त्यांनी आयुष्यभर मातंग समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार; रिपब्लिकन पक्ष; निळा झेंडा आणि माझे नेतृत्व समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाची; आंबेडकरी चळवळीची आणि मातंग समाजाची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या आहोकसंदेशात व्यक्त केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven − six =

error: Content is protected !!
Exit mobile version