Home ताज्या बातम्या पोलिस आयुक्त अंकुश शिंदेनी स्विकारला पदभार,पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बर्खास्त तर...

पोलिस आयुक्त अंकुश शिंदेनी स्विकारला पदभार,पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बर्खास्त तर स्वकेंद्री न राहता नागरिक केंद्र बिंदू ठेवा अधिकार्‍यांना दिली तंबी.

0

पिंपरी,दि.22एप्रिल 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्या नन्तर नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लगेच कामाला सुरुवात केली आहे.पदभार घेताच त्यांनी स्वतःच्या दालनातील टेबलाची अनावश्यक लांबी-रुंदी कमी करत तुमची भव्यता कामातून दिसू द्या, असा संदेश दिला आहे. स्वकेंद्री न राहता नागरिक केंद्र बिंदू ठेवून काम झाले पाहिजे अशा शब्दात आयुक्त शिंदे यांनी पहिल्या मजल्यावरील अधिकाऱ्यांचे कान उपटल्याची चर्चा आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सुरु केलेल्या सामाजिक सुरक्षा पथक बर्खास्त करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
तीन वर्षांपूर्वी महानगपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या शाळेच्या दोन मजली जुन्या इमारतीतून आयुक्तालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तेव्हा शाळेच्या वर्गात प्राथमिक बदल करून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (गुन्हे), सहायक आयुक्त आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बसण्यासाठी दालन तयार करण्यात आली. मात्र, गेल्या दीड वर्षात पहिल्या मजल्यावरील आयुक्तांच्या कार्यालय आणि अँटी चेंबर मध्ये अनेक इंटेरियर डिझायनिंग चेंजेस करण्यात आले होते. परंतु, आयुक्तालयात नागरिकांना बसण्यास वेटींग रुम पुरेशी जागा नाही. तसेच नागरिकांना वाहने लावण्यास जागा नसल्याने ही वाहने प्रमलोक पार्कमधील लोकवस्तीत रस्त्यावर किंवा एमआयडीसीच्या पटांगणाला लागून असलेल्या रस्त्यावर लावावी लागत आहेत; याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नव्हते.
आयुक्तालयातील दालनातील १२ फुटी टेबलावर लावण्यात आलेली काच, अंतर्गत दालनातील आरसे, चकचकीत टेबल तत्काळ काढून टाकावेत असे आदेश आता नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर त्यांच्या कामाच्या पहिल्याच दिवशी दालनातील १२ फुटी टेबल ६ फूट कमी करण्यात आले आहे. तसेच त्यावरील काच आणि उर्वरित टेबल अन्यत्र कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आयुक्तालयात रात्री एक वाजेपर्यंत हे काम सुरू होते. आयुक्त शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत थांबून आगामी काळातील कामकाजाची रूपरेषा ठरविल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी मला भेटायला यायची गरज नाही. तुम्ही तुमची काम करत रहा मी येऊन त्याची पाहणी करेन असेही त्यांनी सगळ्या निरीक्षकांना कळविले आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांना मला संपूर्ण आयुक्तालयाची माहिती घेऊ द्या, मग बोलू, असे सांगितले. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट झाले. आयुक्त शिंदे यांनी पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बरखास्त केले. यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. आयुक्तालयाची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी ओळख करुन चर्चा करतात. मात्र नवीन पोलीस आयुक्तांनी सर्व प्रथम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यातच पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेचे एक पथक बरखास्त केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लवकरच गुन्हे शाखच्या पथकांमध्ये आणि वरिष्ठ निरीक्षकांच्या कामकाज वाटपात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर तिसरे पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदेवाल्यांना तंबी दिली होती. मी असे पर्यन्त दुसरा काम धंदा पहा अन्यथा कारवाईला सामोरे जावा. यासाठी कृष्ण प्रकाश यांनी विशेष पथक ‘सामाजिक सुरक्षा’ ची स्थापना केली. पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करुन अवैध धंद्यावर कारवाई सुरु केली. मटका, जुगार, लॉटरी, अवैद्य दारु, वेश्या व्यवसाय, स्पाच्या नावाखाली अवैद्य धंदे, बेटिंग, वाळू उपसा, गुटखा आदी प्रकारच्या कारवाई सुरु होत्या. अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तपदाच्या पदभार स्वीकारल्यानन्तर पहिल्याच दिवशी त्यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केले. यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. सामाजिक सुरक्षा पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना तत्काळ मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त होण्याचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त शिंदे यांनी सुरु केलेल्या पहिल्याच दिवशीच्या कामामुळे विशेष पथकांचे धाबे दणाणले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × five =

error: Content is protected !!
Exit mobile version