पिंपरी,दि.१७ डिसेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे कार्य महान असून त्यांच्या कार्यास साजेसे रचनात्मक तसेच दर्जेदार स्मारक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वतंत्र जागेवर उभारण्यात येईल असा निर्णय महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी जाहीर केला . पिंपरी येथील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील मोकळ्या जागेत त्यागमूर्ती माता रमाई यांचे उचित स्मारक उभारण्यात येणार आहे . नियोजित स्मारकासाठी स्वतंत्र जागा मिळावी अशी मागणी विविध संघटनांनी महानगरपालिकेकडे केली होती . या नियोजित स्मारकाची माहिती तसेच आढावा घेण्याकरिता डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर महानगरपालिकेत आले होते . त्यांच्यासमवेत नुकतीच महापालिका भवनामध्ये बैठक संपन्न झाली . या बैठकीत भीमराव आंबेडकर यांनीदेखील स्वतंत्र स्मारक उभारण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती . या सर्व बाबींवर विचार विनिमय करुन तसेच जनसामान्यांच्या भावना लक्षात घेता त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक स्वतंत्र जागेत उभारण्याचा निर्णय महापौर माई ढोरे यांनी घेतला आहे . भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाच्या माध्यमातून केलेले महान कार्य भारतीय नागरिकांसाठी महत्वपूर्ण आहे . उपेक्षित घटकांसाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला . त्यांना त्यांच्या कार्यासाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांनी भक्कमपणे साथ दिली . बाबासाहेबांना सदैव साथ देणा – या माता रमाई यांचे कार्यदेखील स्वतंत्रपणे अधोरेखित करण्यासारखे आहे . त्यांच्या त्यागाचे स्मरण आजही कोट्यवधी जनता करीत आहे . त्यामुळे जनभावनेचा आदर राखत त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न स्मारकाच्या माध्यमातून महानगरपालिका करणार आहे . या स्मारकामध्ये माता रमाई यांचा पुर्णाकृती पुतळा तसेच म्युरल्स् आणि बहुउद्देशीय उपक्रम राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे . यासाठी लागणारा वाढीव निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल असे महापौर ढोरे यांनी सांगितले . महापौर माई ढोरे म्हणाल्या , महापालिकेने शहरामध्ये शिवसृष्टी , भीमसृष्टी शाहूसृष्टी आणि फुलेसृष्टीच्या माध्यमातून थोर महापुरुषांचे कार्य लोकांसमोर स्मारकाच्या माध्यमातून मांडले आहे . हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून त्याच धर्तीवर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यावेळी दिली . यावेळी सत्तारुढ पक्षनेते . नामदेव ढाके , माजी महापौर राहुल जाधव , शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे , प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे , नगरसदस्य संतोष लोंढे , राजेंद्र गावडे , माजी नगरसदस्य शांताराम भालेकर , नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत धर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .