पिंपरी,दि.१६ डिसेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा अर्थात शेतकऱ्याला जीव लावणाऱ्या बैलजोडींचा आहे, अशा प्रतिक्रिया बैलगाडा प्रेमींमधून उमटू लागल्या आहेत.
आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. pic.twitter.com/2OBMkam9Ph— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2021
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत आज (दि. १६ ) अंतिम सुनावणी झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून ॲड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे राधाकृष्ण टाकळीकर यांनी दिली.
शासनाने दि. १५ जुलै २०११ च्या परीपत्रकानुसार बैलाचे वर्गीकरण जंगली प्राण्यांमध्ये केले आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडी शर्यत पूर्ण बंद झाले होते. ग्रामीण भागातील शेतक-यांच्या या आवडत्या बैलगाडी शर्यत खेळाकडे लक्ष देवून बैलगाडी शर्यती चालू करण्यासाठी व बैलास जंगली यांच्या वर्गीकरणातून मुक्त करण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून पाठपुरावा सुरू झाला. तसेच, कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यात बैल पळवणे शर्यतीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. असे असताना केवळ राज्यातच बंदी का? असा सवाल करत बैलगाडी प्रेमी नाराज होते.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती सशर्त सुरू करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायदा केलेला आहे. परंतु, या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. मुंबई हायकोर्टाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये बैलगाडा प्रेमींच्या बाजूने निकाल देण्यात आला असून, सशर्त परवानगी देत बैलगाडा शर्यती घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे
ॲड. मुकुल रोहतगी यांनी केला युक्तीवाद…
ज्येष्ठ विधिज्ञ सीनिअर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद करताना कर्नाटक आणि तमिळनाडू येथे बैलगाडा शर्यती सुरू असल्याबाबत न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, बैलाची पळण्याची क्षमता चाचणी अंती सिद्ध झाल्यास शर्यतीसाठी परवानगी द्यावी आणि नियम व अटी घालून शर्यती पूर्ववत सुरू कराव्यात, याबाबत युक्तीवाद केला.
बळीराजाचा सर्वार्थाने मोठा विजय: आमदार लांडगे
न्यायालयाने बैलगाडा प्रेमी आणि शेतकऱ्यांची रास्त बाजू समजून घेतली आणि सकारात्मक बाजूने निकाल दिला आहे. बळीराजाचा हा सर्वार्थाने मोठा विजय आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयानंतर व्यक्त केले. तसेच, पक्षभेद विसरून राजकीय जोडे बाजूला ठेऊन बैलगाडा शर्यतीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभारही मानले आहेत.