Home ताज्या बातम्या लोकाभिमुख प्रशासक…. आयुक्त राजेश पाटील

लोकाभिमुख प्रशासक…. आयुक्त राजेश पाटील

0

पिंपरी,दि.०७नोव्हेंबर २०२१(प्रजेचा विकास प्रतिनिधी):- लेखिका प्रा.वर्षा पाटील
ओरिसातील सर्वात दुर्गम अशा भौगोलिक व प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतही शून्यातून अथक प्रयत्नाने विश्व निर्माण करता येते, हे स्व: कर्तृत्वाने सिद्ध करणारे तडफदार, कर्तव्यदक्ष, सकारात्मक तेचे मूर्तिमंत उदाहरण, आव्हानात्मक बालपण असलेले, राष्ट्रपती व पंतप्रधान पुरस्कार विजेते, उत्तम प्रशासकीय अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी, शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे पिंपरी-चिंचवडचे विद्यमान आयुक्त… राजेश प्रभाकर पाटील. श्री.राजेश पाटील साहेबांचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. एका कष्टकरी बालमजूर पासून ते सनदी अधिकाऱ्या पर्यंतचा आपला संघर्षमय प्रवास त्यांनी ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ या आपल्या आत्मकथन पर पुस्तकात शब्दबद्ध केलाय. सामाजिक विषमता व आर्थिक विवंचनेने ग्रस्त, अपयशाने निराशेच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाईला दिशादर्शक ठरणारे हे पुस्तक. त्यामुळेच हिंदी, गुजराती, उर्दू ,ओडिया, इंग्लिश भाषेत भाषांतरित झाले आहे. त्यातून त्यांच्या विविध पैलूंचा अनेकांना परिचय झाला आहे.2005 च्या तुकडीतील आय. ए. एस.अधिकारी श्री. राजेश पाटील यांची ओरिसा केडर मध्ये नियुक्ती झाली. 2006 ते 2021 या कालावधीत या महाराष्ट्राच्या सुपुत्राने समाजातील विविध घटकांसाठी ओरिसा राज्यात गौरवास्पद कार्य केले.भ्रष्टाचाराने बरबटलेल्या शासन प्रणालीत एखाद्या दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने ठरवले तर समाज उपयोगी, लोककल्याणकारी कार्य कमी कालावधीत तो कसा करू शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजापुढे मांडले आहे.

ओरिसातील सर्वात दुर्गम अशा आदिपंका गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी म्हणून भेट देणारी प्रथम व्यक्ती म्हणजे श्रीयुत राजेश पाटील. हे उदाहरणच त्यांच्या कार्यतत्परते बद्दल, समाजाप्रती असलेल्या तळमळी बद्दल खूप काही बोलून जाते,प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर ओरिसातील कोरापुत, कंधमाल,मयुरभंज या आदिवासीबहुल जिल्ह्यात त्यांनी कलेक्टर म्हणून शिक्षण व शेती क्षेत्रात जे कार्य केले ते खरोखरच उल्लेखनीय व दखलपात्र आहे. त्यांनी केलेल्या भरीव कार्याचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख. ५८ % आदिवासी असलेला ओडिसातील मयुरभंज हा सर्वात मोठा जिल्हा.वेगवेगळ्या बोलीभाषा असलेल्या ५२ प्रकारच्या आदिवासी जमाती येथे आढळतात.२०१२ – २०१७ या कालावधीत श्री. पाटील येथे कार्यरत होते.२०१३-२०१५ मध्ये राजेश पाटील यांची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख करून देणारी स्वयंप्रेरित ‘मू भी पढीबी‘( मी पण शिकेन) ही शिक्षण क्षेत्रातील समाज परिवर्तनशील मोहीम त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवली.

मयुरभंज जिल्ह्याच्या मध्यभागी २५ चौ. किलोमीटरचे घनदाट ‘सिमलीपाल’ हे जंगल आहे. येथील दुर्गम ग्रामीण भाग, दूर दूर वसलेले लहान लहान असंख्य पाडे, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, बोली भाषा व शिक्षणाच्या भाषेतील प्रचंड तफावत, कमकुवत आर्थिक परिस्थिती, शिक्षणाविषयी असलेली अनास्था, शिक्षकांची अनियमित व अपुरी उपस्थिती ही सर्व प्रचंड आव्हाने त्यांच्या समोर होती.परिस्थिती पुढे नतमस्तक न होता परिस्थितीला आपले वाहन करून त्यावर आरूढ होणाऱ्या पाटील साहेबांनी ‘इच्छा तिथे मार्ग ‘ या उक्तीप्रमाणे एकेका आव्हानावर सुव्यवस्थित नियोजन करून मात केली.समाजातील काही विरोध करणाऱ्या अपप्रवृत्तींना ही त्यांनी कौशल्याने या मोहिमेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांना या अभियानात सामावून घेतले. यातच त्यांची कार्यकुशलता दिसून येते.शिक्षणाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या शिक्षकांमध्ये आणि गावातील लोकांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण केलं. प्रत्येक गावात ‘ गाव शिक्षा परिषद ‘ स्थापन करण्यात आली. जेथे शिक्षकांना पोहोचणं अशक्य होतं अशा अतिदुर्गम भागात शिक्षकांसाठी बराक बांधून निवासाची सोय केली. शाळाबाह्य व शाळेत नियमित न येणारी मुलं मुली शोधण्यात आली. शाळेत न येण्याची कारणे जाणून त्यावर तोडगे काढण्यात आले. ‘ मू भी पढीबी ‘ च्या एकंदरीत झंझावातात पाच हजाराच्या वर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात पुनश्च सामील करण्यात आले.कौशल्यावर आधारित वेगवेगळ्या कोर्सेस साठी या मुलांना पाठवून शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आनंदमयी शिक्षणावर भर देऊन ‘ रचनावाद ‘ सिद्धांताचा उपयोग करून तो रुजवला.दुसरी मोठी समस्या म्हणजे बालमजुरांची होती. ही मुलं अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे या मार्गाला लागल्याने शिक्षणापासून वंचित होती. त्यांना या प्रवाहात सामील करणे अत्यंत कठीण काम होतं. पण यावरही मात करण्यात आली. सर्वप्रथम जिल्हाभर गुप्तपणे सर्व्हे करून जेथे-जेथे बालमजूर काम करत होते तेथे तेथे एकाच वेळी धाडी टाकल्या. बालमजुरांना मुक्त करून स्पेशल ‘ रेस्क्यू सेंटर‘ मध्ये ठेवण्यात आले.या मोहिमेदरम्यान अनेक मुलांच्या हृदय विदारक कहाण्या समाजासमोर आल्या. यात अनाथ बाल मजूरही होते. ज्यांना जगाच्या पाठीवर कोणी नव्हते. त्यांच्या पाठीवर राजेश पाटलांनी मायेचा हात ठेवून आधार दिला.जेव्हा जेव्हा कोणी रेस्क्यू सेंटरला भेट देत तेव्हा आपला परिचय देताना ही मुलं आम्ही कलेक्टर पाटील सरांची मुल आहोत असं अभिमानाने सांगत होती.समन्वयीत शिशू सुरक्षा योजने अंतर्गत बाल कामगारांना मासिक अनुदान दिले. काही बालकामगारांना तांत्रिक प्रशिक्षण दिले. पाचशेच्या वर बालमजुरांना कायमस्वरूपी शिक्षण प्रवाहात सामील करण्यात आले.उज्वल भविष्याची स्वप्न पाहण्यास परिस्थितीने गांजलेल्या दिशाहीन बालकांना आयुक्तांनी सक्षम व स्वावलंबी केले.कापूस वेचणीतून बाल मजूर म्हणून कामाला सुरुवात करणाऱ्या आठ-नऊ वर्षांचा बालकाने पुढे पाव, भाजीपाला विकून, ट्रॅक्टर वर मजुरी करून, विहीर खोदून शिक्षण संपादन केलेल्या, ह्या सनदी अधिकाऱ्याने शिक्षणापासून वंचित असणाऱ्या हजारो बालकांना शिक्षणाची कवाडे उघडून दिली. त्यांच्या जीवनाला नवीन दिशा दिली. आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा या आधुनिक भगिरथाने नेली अशा पद्धतीने अथक प्रयत्नाने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मयुरभंज जिल्ह्याने देशातील पहिला “शाळा बाह्य विद्यार्थी मुक्त ‘ आणि “बाल मजूर मुक्त ‘ जिल्हा होण्याचा बहुमान मिळवला.पाटील साहेबांच्या कार्यकाळात पुढील तीन वर्ष सतत मयुरभंज जिल्ह्याने ‘शाळा बाह्य विद्यार्थी मुक्त‘ व ‘बाल मजूर मुक्त जिल्हा ‘ होण्याचा बहुमान मान कायम ठेवला.

देशाच्या सैन्यदलात तेथील आदिवासी मुलांची संख्या अतिशय कमी होती. ही उणीव भरून काढण्यासाठी श्री. पाटील यांनी व्यापक मोहीम आखली. तालुका गणिक योग्य मुलांची निवड करून त्यांना निवृत्त सेना अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिले. या कालावधीत सैन्यदलात निवड झालेल्या एकंदर आदिवासी मुलांमध्ये ८० टक्के मुलं एकट्या मयुरभंज जिल्ह्याची होती. आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त असणाऱ्या, शिक्षण संधीच्या अभावामुळे नक्षलवादाकडे वळणारी पाऊल त्यांनी उदात्त कार्य असणाऱ्या देशसेवेकडे वळवली.युनिसेफ राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोगाने या गौरवशाली कामाची दखल घेऊन यांच्यावर डॉक्युमेंट केल आहे. नोबेल पारितोषिक विजेते श्री. कैलास सत्यार्थी यांनी या कामाची खूप प्रशंसा केली.टीव्ही वर क्राईम रिपोर्ट मध्ये या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली व हा रिपोर्ट भारतभर प्रदर्शित केला गेला.एवढेच नाही तर लोककल्याणाचा अहोरात्र ध्यास घेतलेल्या व त्यासाठी सतत कार्यमग्न असणाऱ्या या स्वच्छ सनदी अधिकाऱ्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात सर्वतोपरी कार्य केले.” शौर्य आणि धैर्य हीच ज्यांची संपत्ती आहे त्यांनी काय केवळ स्वतःसाठी जगाव?जगाच्या कल्याणासाठी त्याग करायलाही त्यांनी पुढे आलं पाहिजे. नुसतं समजलं म्हणून समाधान मानणारे करंटे, कृतीत उतरवणारे खरे भाग्यवंत. हे स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांनी कृतीत आणून सार्थ ठरवले आहे.माणुसकीचा झरा जिवंत असणाऱ्या या अधिकाऱ्याने समाजातील उपेक्षित दिव्यांगांसाठी ही केलेले भरीव काम देखील कौतुकास्पदच आहे. कोरापुत,मयुरभंज मध्ये एक खिडकी योजनेअंतर्गत दिव्यांगांचे समुपदेशन केले. त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढवला . आत्मनिर्भर करून त्यांना समाजात मानाचे स्थान निर्माण करून दिले.अपंगांच्या या पुनर्वसन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2014 मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करून या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यात आला.हाडाचा शेतकरी असलेल्या ह्या निस्पृह प्रशासकाने आदिवासी शेतकरी बांधवांसाठी ही तळमळीने काम केले. मनरेगा योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या फळबाग योजना, आपल्या कार्यकुशलतेने यशस्वी करून दाखविल्या.सुरुवातीला प्रशासनावरील असलेल्या अविश्वासामुळे आदिवासी शेतकरी बांधवांचा प्रतिसाद अत्यंत कमी होता. पण जेव्हा सरकारी यंत्रणाच त्यांच्या दारी येऊन काम करू लागली .सरकारी यंत्रणेच्या कामात पारदर्शकता आणण्यात आली तेव्हा त्यांचा विश्वास बसला व प्रतिसाद चांगला मिळू लागला.
चार वर्षात एकंदर २२ हजार हेक्‍टर एवढ्या जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे लावली. व्यावसायिक वन शेती करण्यात आली. आंबा फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना प्रशिक्षित करून दिल्लीच्या ‘मदर डेरी’ बरोबर त्यांचा करार करून देऊन त्यांचे आंबे दिल्लीपर्यंत पोहोचवले.यामुळे बाग मालकांना पाच ते सहा पट अधिक रक्कम मिळू लागल्याने त्यांची आर्थिक विवंचनेतून सुटका होण्यास मदत झाली. अधिक शेतकऱ्यांना यात सामील करून त्यांची शेतकऱ्यांची स्वतःची उत्पादक कंपनी तयार केली .पाटलांच्या या अभिनव प्रकल्पाला २०१४-२०१५ चा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) देशातील ५३० जिल्ह्यांमधून उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पंतप्रधान पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले, आदिवासींच्या पडीक जमिनीवर यशस्वी फळबागेच्या प्रयोगासाठी २०१६ चा मुख्यमंत्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले,मयुरभंज च्या मध्यभागी असलेल्या सिमलीपाल अभयारण्याच्या मध्यभागी ५६ गाव होती. गावागावात जाऊन आदिवासी बांधवांना वैयक्तिक हक्क, सामुदायिक हक्क, समुदाय संसाधन हक्क हे सर्व हक्क देण्यात आले. सिमलीपाल हे देशातील पहिले अभयारण्य ठरले जिथे आदिवासींना सामुदायिक वन हक्क देण्यात आले या अशा कार्यातूनच त्यांची तळागाळातील लोकांसाठी असलेली तळमळ दिसून येते.केंदुहरी या सिमलीपाल मधील अतिदुर्गम आदिवासी गावात पाण्याची सोय नव्हती. विजेशिवाय गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणीपुरवठा ही योजना त्यांनी येथे अतिशय कल्पकतेने राबवली.” सर आमुकू जिबन दान देइकी गले” (सरांनी आम्हाला त्यांच्या प्रयत्नाने जीवनदान दिले) हे आदिवासी बांधव मोठ्या आत्मीयतेने सांगतात. यातूनच त्यांच्या कार्याची पावती आपणास मिळते.दुर्गम भागात ‘विजेशिवाय गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणीपुरवठा’ ही नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी सलग दोन वेळा त्यांना मुख्यमंत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.महात्मा फुले,आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित असलेल्या आयुक्तांनी गरीब आदिवासी विधवा, परित्यक्ता अविवाहित , महिला ज्यांच्याकडे संपत्तीचा मालकीहक्क सहसा नसतो. अशा ५५०० महिलांना जमिनीचा हक्क मिळवून देण्यात संवेदनशील मन असलेले आयुक्त यशस्वी ठरले.तेथील ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेचा कणा असणाऱ्या सबाई गवत उद्योगाला त्यांनी आधुनिक रूप दिले.एन.आय. डी. , एन. आय. एफ. टी. सारख्या राष्ट्रीय पातळीवरील उच्च दर्जाच्या संस्थांना सहभागी करून घेतले.सबाई गवतापासून वेगवेगळी सुंदर आकर्षक डिझाईन्स तयार केली. नामांकित ‘फॅब इंडिया’ या कंपनीशी वस्तू विक्रीचा करार करण्यात आला. यामुळे हजारो महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या.पारंपारिक लाख व रेशीम उद्योगाला ही नवीन रूप देऊन अनेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत करण्यात आली.खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणचा स्तुत्य उपक्रम राबवला .त्यांचा कार्यकाळ तेथील जनतेसाठी सुवर्णकाळच ठरला.एखाद्या सनदी अधिकाऱ्याने खरोखर समाज कल्याणाचे कार्य डोळ्यांसमोर ठेवून काम केले तर अशक्य असं काहीच नाही हे सामान्याकडून असामान्याकडे प्रवास करणाऱ्या आयुक्तांनी दाखवून दिले.नवीन येणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना पुढे, समाजापुढे ते एक आदर्श उदाहरण आहेत.ह्या ध्येयवेड्या सनदी अधिकाऱ्याची तळमळ व जाणिवेतून उभे राहिलेले कार्य साऱ्या शिक्षण क्षेत्रासाठी, शेती उद्योगासाठी दीपस्तंभी आहे.त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून असे आणखी सनदी अधिकारी निर्माण झाले तर गांधीजी ,नेहरू , शास्त्रीजींच्या स्वप्नातील भारत साकारायला वेळ लागणार नाही.कर्तव्याचा महामेरू असलेल्या या आधुनिक भगिरथा साठी , आधुनिक जाणता राजासाठी पुढील काव्यपंक्ती अतिशय समर्पक ठरतील.

 

जिंदगी की असली उडान तो अभी बाकी है
जिंदगी के कही इम्तेहान तो अभी बाकी है
अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन हमने
अभी तो सारा आसमान बाकी है !!! 

आपल्या महाराष्ट्राच्या मायभूमीतही ते असेच उज्वल कार्य करतीलच त्यासाठी त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा.

लेखिका

प्रा. वर्षा पाटील.

एम. एम. जुनियर कॉलेज
काळेवाडी (थेरगाव)
पुणे-३३

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =

error: Content is protected !!
Exit mobile version