अमरावती,दि.१५ ऑक्टोबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- करोना काळात शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक कमी गुण दिल्याचा प्रकार येथील महर्षी पब्लिक स्कू लमध्ये उघडकीस आला.यानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण, दोन महिन्यानंतरही कारवाई न झाल्याने बच्चू कडू यांनी खंत व्यक्त करून माफी मागितली आहे. आपल्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ एका विद्यार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू के ले होते. कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण सोडवण्यात आले, पण या संपूर्ण प्रकरणात शालेय शिक्षण विभागाची बेपर्वा वृत्ती समोर आली आहे.महर्षी पब्लिक स्कूलमधील दहावीतील आदित्य काळमेघ या हुशार विद्यार्थ्याने परिस्थिती चांगली नसल्याने शाळेचे शुल्क भरले नाही. म्हणून त्याला दहावीत केवळ ५२ टक्के गुण देऊन त्याचे शैक्षणिक नुकसान करण्यात आले. याची गंभीर दखल शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली होती. तसेच चौकशी करून या शाळेवर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु दोन महिने उलटूनही शाळेवर शिक्षण विभागाने कुठलीच कारवाई केली नसल्याने आदित्य काळमेघ याने उपोषणसुद्धा केले. दरम्यान, ज्या खात्याचे बच्चू कडू शिक्षण राज्यमंत्री आहे त्या खात्यातील अधिकारीही आदेशालाही जुमानत नसल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यानी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दुसरीकडे, निवासी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बैठक सुरू असतानाच भाजप, मनसे व शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या विद्यार्थ्याला न्याय देऊन शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यानी दिली. करोना संकट काळात आदित्यच्या वडिलांचा रोजगार गेला. त्यामुळे ते शुल्क भरू शकले नाहीत. परंतु जुळवाजुळव करून त्यांनी २३०० रुपये परीक्षा शुल्क भरले होते. परंतु, शाळेचे पूर्ण शुल्क न भरल्यामुळे या विद्यार्थ्याच्या गुणांमध्ये मोठी कपात करून केवळ आकसापोटी या शाळेने केवळ ५२ टक्के गुण दिल्याचा आरोप या विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे. आदित्यला सातवीत ८१ टक्के, आठवीत ८३ तर, नववीत ८१ टक्के टक्के गुण मिळाले असताना, आता दहावीत फक्त ५२ टक्के गुण कसे असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. यावर्षी मूल्यांकन पद्धतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना चांगले गुण देखील मिळाले आहे. असे, असताना आदित्यला मुद्दाम केवळ ५२ टक्के टके गुण दिल्याचा आरोप पालकांनी आणि मुलांनी केला आहे.