चिखली,दि.03 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- दत्ता साने हे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा वाघ होते. त्यांच्या अकाली जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय कायम साने कुटुंबासोबत आहे. या कुटुंबामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांच्या विनंतीवरून त्यांनी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ताकाका साने यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साने कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. यश साने यांच्याकडून त्यांनी प्रभागातील विकासकामांची माहिती जाणून घेतली. तसेच आगामी निवडणुकीसाठी साने कुटुंबामागे राष्ट्रवादीची ताकद उभी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, नाना काटे, वैशाली काळभोर, विक्रांत लांडे, विजय लोखंडे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, आतिष बारणे, कविता आल्हाट, संगीता आहेर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेससह स्व. दत्ताकाका साने प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.