पिंपरी,दि.02 सप्टेबंर2021 (प्रजेचा विकासू न्युज प्रतिनिधी) :– ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाल्यांनी महिला अधिका-यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आज जाहीर निषेध करण्यात आला. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांची मस्ती मोडण्यासाठी अधिका-यांची सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. ठाण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील बेकायदेशीर व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करताना अधिका-यांनी अधिकचे पोलीस संरक्षण घ्यावे. कोणत्याही प्रकारची जोखीम उचलून अधिका-यांनी कारवाई करू नये. स्वतःच्या सुरक्षेचा विचार करूनच आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन स्थायी समिती सभापती अॅड.नितीन लांडगे यांनी केले.
सभापती अॅड.नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.1) रोजी स्थायी समिती बैठक पार पडली. सभापतींसह सर्वच सदस्यांनी ठाणे महापालिकेच्या हद्दीत महिला अधिका-यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा मुद्दा खूपच गांभिर्याने घेतला. ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येणा-या कासारवडवली नाक्यावरील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आपल्या कर्मचा-यांसह गेल्या होत्या. कारवाईदरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्यांकडून त्यांच्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला. बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटून पडली. तर, बचावासाठी धावलेल्या एका अंगरक्षकाचेही एक बोट तुटून पडले. कल्पिता पिंपळे या तेथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. आज स्थायी समिती सभेत या घटनेच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांवर देखील असा प्रसंग ओढवू शकतो, अशी शक्यता व्यक्त करत सभापती, सदस्य व अधिकारी यांनी या घटनेचा तिव्र निषेध केला.
अध्यक्ष नितीन लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर फेरीवाल्यांवर तसेच अतिक्रमण निर्मूलन कारवाई करताना अधिका-यांनी सतर्क राहिले पाहिजे. कारण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून अधिका-यांवर तसेच कर्मचा-यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. याचा विचार करून अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना मुबलक पोलीस संरक्षण द्यावे. त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात करावी, अशा सूचना त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या. त्यावर आयुक्त पाटील यांनी त्वरीत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागातील अधिका-यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या. अधिका-यांची सुरक्षा यंत्रणा वाढवल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. अतिक्रमण कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, अशी आपेक्षा स्थायीतील सर्व सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली.
गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून फिरता जलकुंभ रथ
गणेशोत्सवाला नुकतीच सुरवात होणार आहे. राज्य शासनाने उत्सव साजरा करण्यास निर्बंध घातले आहेत. निर्बंधाचे तंतोतंत पालन करूनच उत्सव साजरा करावयाचा आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास मुभा असली तरी गणरायांना निरोप देताना विसर्जन घाटावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. गर्दीमुळे एकमेकांचा संपर्क येणार असून यामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची दाट शक्यता राज्य शासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनाला देखील सरकारकडून निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रभागनिहाय फिरत्या विसर्जन जलकुंभ रथाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिकेच्या 32 प्रभागामध्ये फिरता जलकुंभ रथा नागरिकांच्या दारोदारी फिरला पाहिजे. त्यामुळे नागरिकांना गणेश विसर्जन सोहळा विधीवत पार पाडता येईल. लोकवस्तीनुसार आवश्यकता भासल्यास कमी अधिक प्रमाणात रथाची संख्या वाढवावी. नागरिकांची कसलीही गैरसोय होता कामा नये, अशा देखील सूचना सभापती लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या. त्यावर प्रशासनाने सकारात्मक उत्तर देत कामाला लागण्याची तयारी दर्शवली.