रत्नागिरी,दि.24 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं.त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी बाहेर येण्यास नकार दिला होता. नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नारायण राणे त्यांच्याच गाडीतून पोलिसांबरोबर रवाना झालेत. यावेळी निलेश राणे यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असुन संपुर्ण वातावरण हे तणावपुर्ण झाले आहे. दरम्यान, अमित शहा यांनी फोनवरून नारायण राणेंना त्यांच्या बरोबर असल्याचे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.नारायण राणेना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले असुन पुढील कारवाही महाड पोलिस करतील
नक्की काय आहे प्रकरण ?
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान औरंगाबादमध्येही शिवसेनेने नारायण राणेंविरोधात आंदोलन केले. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले.
नारायण राणेंच्या जीवाला धोका -प्रसाद लाड
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटू लागलेत. नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपा नेतेही आक्रमक झालेत. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीकेचा प्रहार सोडले आहेत.जाणीवपूर्वक कोणतीही कलमं नसताना राणेंना अटक केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.
“ही अटक निषेधार्ह आहे. नारायण राणे हे लोकप्रतिनिधी आहेत. खासदार आहेत. केंद्रात मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री आहे. राणे साहेब जेवत असतानाच पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने वातावरण चिघळले आहे त्यांना खेचलं. त्यांच्या हातात जेवणाचं ताट होतं. त्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे. केंद्रातील कॅबिनेट मंत्र्यासोबत राज्य सरकारनं जे वर्तन केलं, ते चुकीचं आहे. राणे साहेबांना गाडीत बसवलं आहे. त्यांना कोणत्या कलमाखाली अटक करण्यात आली याची देखील कल्पना नाही. एसपी बोलायला तयार नाहीत. दरवाजा बंद करून बसले आहेत. आम्हाला अशी भीती आहे की, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे. राणे साहेबांना सहा वाजेपर्यंत असंच ताटकळत ठेवून कोर्टापुढे न नेता त्यांना रात्रभर तुरुंगात ठेवून रात्रभर ञास देण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो.”, असं भाजपा नेते प्रसाद लाड यांनी सांगितलं.