पिंपरी,दि.११ मार्च२०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० घेण्यात येणार होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचे प्रसिद्धी पत्रक लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी जारी केले आहे. या पत्राकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ‘च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ रोजीच्या पत्राद्रारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आले आहे.राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निबंध लावेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल. असे म्हटले आहे.
पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकल्यामुळे आंदोलन केले आहे. मोठ्या संख्यने एमपीएसीचे विद्यार्थी आंदोलनासाठी एकत्र आले आहे. राज्यात निवडणूका होऊ शकतात, नेत्यांच्या सभा होतात तर परीक्षा का होऊ शकत नाहीत असा सवाल या आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.पुण्यातील नवी पेठ येथे संतप्त एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली.शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केलं. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरु केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी परीक्षार्थींची धरपकड सुरु केली.