पिंपरी,दि.12 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुंबई-बंगळूर महामार्गालगत असलेल्या ताथवडे गायराणातील ग्रामदैवत वाघजाई देवी मंदिरा भोवताली असलेल्या विविध प्रजातींच्या शेकडो वृक्षांवर येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कामगारांनी अचानकपणे सकाळी सातच्या सुमारास जेसीबी फिरविल्याचा प्रकार घडला.
मंदिराचे पुजारी नागा साधू महंत तुलसीगिरी महाराज हे शेजारील ध्यान खोलीत साधनेला बसले असता बाहेरून कडी लावण्यात आली काही वेळाने त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी काही भक्तांना फोन करून बोलावून बाहेर जात या वृक्षतोडीला विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करून ढकलून देण्यात आले असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देत मदत मागितल्याने हिंजवडी पोलिसही दाखल झाले मात्र या प्रकारची कोणतीही तक्रार रात्री उशिरा पर्यंत घेण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले.
ताथवडे येथील सर्वे क्रमांक ९९ मधील गायरणात ग्रामदैवत वाघजाई देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या भोवताली विविध प्रजातींचे दोनशेहुन अधिक सुमारे ५ ते १० वर्षे वयांची झाडे होती. मात्र एका बांधकाम व्यावसायिकाच्या सांगण्यावरून गुरुवारी (दि ८) सकाळी सातच्या सुमारास त्याच्या बाऊन्सर्स, सुरक्षारक्षक यांच्या गराड्यात जेेेसीबी आला आणि सुमारे पन्नासहुन अधिक झाडे तोडण्यात आले याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागालाही संपर्क करण्यात आला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली.
पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे –
नागासाधू महंत तुलसीगिरी महाराज मी मंदिराचा पुजारी असून दिव्यांग आहे. मंदिर परिसरातील झाडे तोडताना मी अडवणूक करण्यासाठी गेलो असता मलाही धक्काबुक्की करण्यात आली याबाबत मी पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार करणार आहे.
शिवाजी गवारी (प्रभारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी)
बाबांचं पूर्वीच स्टेटमेंट आमच्याकडे आहे त्यात त्यांनी म्हणल आहे की मला कोणापासूनही धोका नाही माझे कोणाशी वैर नाही तरीही सर्व काही पडताळून योग्य कारवाई केली जाईल.
अतिशय निंदनीय बाब – धनंजय देसाई ( राष्ट्रीय अध्यक्ष हिंदूराष्ट्र सेना)
संत शिरोमणी तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीत साधू संतांची असा घोर अवमान-अवहेलना करणे अतिशय निंदनीय आहे कारवाई करावी.