पिंपरी,दि.01 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणा-या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पीसीसीओई) महाविद्यालयाने फाऊंडेशन फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च (एफआयआर) या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थेशी नुकताच सामंजस्य करार केला.
एफआयआर ही संस्था मुलभूत व उपयोजित संशोधनाला प्राधान्य देते. वेगवेगळ्या विषयांवरील संशोधकांना एकत्र आणून अंर्तविषय संशोधनाला चालना देणे हे ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या संशोधनपर प्रकल्पांमार्फत हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न ते करत आले आहेत. पीसीसीओई महाविद्यालयाने देखील मागील काही वर्षात अभियांत्रिकी संशोधनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पीसीसीओईने आतापर्यंत 200 हून अधिक पेटंटस, 2000 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले आहे. एफआयआरचे सचिव डॉ. अरविंद शालिग्राम, पीसीईटीचे अध्यक्ष सचिव ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीआरचे प्राचार्य डॉ. गजानन परिशवाड, डॉ. सचिन ईटकर यांच्या उपस्थितीत करारावर सह्या करण्यात आल्या. या करारांतर्गत शहरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात स्मार्ट प्रकल्प, ऊर्जा परिवर्तन व इष्टतम वापर, बायो टेक्नोलॉजी यासारख्या विषयांवर संयुक्त संशोधनपर प्रकल्प राबविले जाणार आहेत. अशी माहिती पीसीसीओईच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली.