शिर्डी,दि.18 सप्टेबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह स्वतःला गोळी झाडल्याची घटना ताजी असतानाच शिर्डीमध्ये मुलीने लग्नास नकार दिल्याने तरूणाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तरूणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील विक्रम मुसमाडे या तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरूणीवर गोळीबार करत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सदर तरूणी सुदैवाने वाचली आहे मात्र दुसरी घटना शिर्डीमध्ये घडली असून काल गुरूवारी दुपारी सार्थक बनसोडे या तरूणाने मुलीने लग्नास नकार दिल्याने तिच्या घरासमोर स्वतःला पेटवून घेतलं आहे.या घटनेत सदर मुलीचे वडील आणि तरुणीही जखमी झाली आहे. मागील 5 वर्षांपासून दोघं एकत्र असल्याचं मुलाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
90 टक्के भाजलेल्या तरूणावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु केला. शिर्डीच्या घटनेत संबधित तरुणाच्या फेसबुकवर अकांऊटवरून सुसाईड नोट आणि काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. याचा देखील सायबर सेल तपास करत आहेत.