नवी दिल्ली,दि. 18 सप्टेंबर 2020( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने टाळेबंदीच्या काळानंतर आता पुन्हा नियमित प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत. मात्र असे प्रशिक्षण सुरू करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दि. 8 सप्टेंबर, 2020 रोजी जाहीर केलेल्या मानक कार्यप्रणालीचे (एसओपी) पालन करण्यात येत आहे. औद्योगिक तांत्रिक संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) अल्पकालीन प्रशिक्षण संस्था तसेच राज्य कौशल्य विकास अभियान आणि इतर केंद्र आणि राज्य मंत्रालये तसेच विभाग, राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (एनआयईएसबीयूडी), भारतीय उद्योजकता संस्था (आयआयई) यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून कोविड-19 चा प्रसार होऊ नये, यासाठी सर्व कार्यालयांमध्ये कशा पद्धतीने दक्षता घेतली जाणे आवश्यक आहे, त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सावधगिरीच्या उपायांचीही रूपरेषा तयार करण्यात आली आहे.
कोविड-19 महामारीमुळे सर्व कार्यास्थानी कार्यपद्धतीमंध्ये कमालीचा बदल झाला आहे. यापूर्वी असे बदल कामांच्या ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे झालेले आहेत. कामांमध्ये गतिशीलता आली आहे. तसेच कौशल्ये विकसित करण्यासाठी नवीन क्षेत्रे उदयास आली आहेत. यामध्ये टेलिमेडिसीन म्हणजेच दूर-वैद्यकीयसेवा, निर्जंतुकीकरण या क्षेत्रांमध्ये कौशल्य, पुनर्कौशल्य आणि असलेल्या कौशल्यांमध्ये अद्ययावतपणा आणणे आता गरजेचे झाले आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आपल्या ‘भारतकौशल्य’ या पोर्टलच्यावतीने 29 लोकप्रिय अभ्यासक्रम, 71 अभ्यासक्रमांचे ई-लर्निंगसाठी व्हिडिओ आणि सर्व 137 प्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रश्नबँक अशी सामुग्री उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (एनएसक्यूएफ) अंतर्गत तयार केलेले अभ्यासक्रम आणि इतर आयटीआयच्या अभ्यासक्रमांचा लाॅकडाउनच्या काळामध्ये 9,38,851 प्रशिक्षिणार्थींनी लाभ घेतला. आणखी 1,31,241 प्रशिक्षणार्थींनी भारतकौशल्य मोबाईल अॅपच्या माध्यमातून लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे नॅशनल इनस्ट्रक्शनल मिडिया इन्स्टिट्यूट (एनआयएमआय) या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वायत्त संस्थेने 3080 ऑनलाइन वर्ग घेतले. त्याचा लाभ 16,55,953 जणांनी घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले.
याशिवाय मंत्रालयाअंतर्गत महा संचालनालयाच्या औद्योगिक भागीदार असलेल्या संस्था-कंपन्या, उदाहरणार्थ – क्वेस्ट अलायन्स, आयबीएम, नॅसकाॅम- मायक्रोसाॅफ्ट आणि सिस्को यांनी 1,84,296 जणांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे. या व्यतिरिक्त 35 सीटीएस व्यवहारांसाठी 16,767 विशेष ऑनलाइन वर्ग घेण्यात आले आणि राष्ट्रीय कौशल्य संस्थेचयावतीने कुलाकुसर प्रशिक्षण योजनेनुसार देशामध्ये 33 ठिकाणी वर्ग घेण्यात आले. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेच्या अल्प मुदतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ एनएसडीसीअंतर्गत मोठ्या संख्येने लोकांनी घेतला. यामुळे कौशल्य हस्तगत करू इच्छिणा-यांना आभासी माध्यमातून प्रशिक्षण घेण्यासाठी या पोर्टलचा उपयोग झाला. या दूरस्थ प्रशिक्षण पद्धतीमुळे सर्वांच्या शिक्षणाला गती प्राप्त होऊ शकली आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आरे. के. सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली.