नवी दिल्ली,दि. 18 सप्टेंबर 2020( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- फायदेशीर शेतीचे स्वरूप त्या प्रदेशातील कृषी- हवामान स्थिती, साधनसंपत्तीची उपलब्धता, बाजारातील शक्ती, शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक स्थिती, शेतमालाची मागणी आणि पुरवठा इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असते. त्यानुसार भारत सरकार तांदूळ, गहू, डाळी, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेंतर्गत( एनएफएसएम) नगदी पिके, एनएफएसम अंतर्गत तेलबिया,एकात्मिक फलोत्पादन विकास मोहीम( एमआयडीएच) अंतर्गत फळपिके यांसारखी विविध पिके/ लागवड प्रणाली यांवर भर देत आहे. पिके/ शेतीचे स्वरूप यांविषयीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांच्या शेतावर राज्याच्या कृषी विभागाकडून/ भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून/ राज्य कृषी विद्यापीठांकडून/ कृषी विज्ञान केंद्रांकडून दिली जात आहे आणि योग्य प्रकारच्या पिकांची/ शेती प्रणालीची निवड करण्याबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद- भारतीय शेती प्रणाली संशोधन संस्था, मोदीपुरम या संस्थांनी व्यापक संशोधन( प्रत्यक्ष स्थानावर संशोधन) आणि शेतकऱ्यांच्या सहभागाच्या माध्यमातून( शेतावर संशोधन) पीक विविधतेबाबत तंत्रज्ञान वैधता प्रक्रिया हाती घेतली आहे. एआयसीआरपी- एकात्मिक शेती प्रणाली यांच्या मार्गदर्शनाखाली 25 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 34 राज्य कृषी विद्यापीठांच्या आणि एका केंद्रीय विद्यापीठाच्या सहभागाने ती राबवली जात आहे.
विविध प्रकारच्या शेती प्रणालीसाठी लागवड प्रणाली वेळापत्रक निवडण्याबाबत एआयसीआरपीच्या माध्यमातून 36 ठिकाणांवर एक अभ्यास करण्यात येत असून 20 राज्यांमधील 31 जिल्ह्यांमध्ये एकात्मिक शेती प्रणाली विषयी हा प्रयोग राबवण्यात आला आहे.
शेती, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्य सरकारे, आयसीएआर, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांच्या सहकार्याने सप्टेंबर 2020 मध्ये लागवड प्रणालीच्या अधिक चांगल्या नियोजनासाठी सात कृषी हवामान विभाग परिषदांचे आयोजन केले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.