मुंबई,दि.18 सप्टेबंर 2020( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ या ऑनलाईन सुविधेचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन झाले.
माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, युनिसेफच्या राज्यातील आहारतज्ज्ञ श्रीमती राजलक्ष्मी नायर आदी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले.
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माविम अधिनस्त बचत गटांच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेला शेतमालाला पारंपरिक बाजारापेक्षा अधिक बाजारभाव आणि व्यापक तसेच खात्रीशीर बाजारपेठा मिळवून देण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार माविमने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कृतीदलाच्या सहाय्याने या ई- सुविधेचे निर्माण केले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून माविमचे एकूण 1 लाख 37 हजार स्वयंसहायता बचत गट आहेत. त्यापैकी 97 हजार 499 ग्रामीण 39 हजार 591 शहरी गट आहेत. माविमचे 361 लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) आहेत. या बचत गटांशी 11 लाख 81 हजार ग्रामीण तर 4 लाख 28 हजार शहरी महिला जोडलेल्या आहेत.
‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’मध्ये सुमारे दीड लाख शेतकरी महिलांची, त्या उत्पादित करत असलेल्या शेतमाल तसेच कृषीपूरक उत्पादनांची माहिती भरण्यात आली असून यामध्ये अन्नधान्य, विविध भाजीपाला, फळभाज्या, फळपिके, नगदी पिके याचबरोबरीने शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी उत्पादनांबाबतची माहितीदेखील भरण्यात आली आहे. यापुढे ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार असून त्यामुळे राज्यातील माविमच्या बचत गटाच्या महिलांकडे असलेल्या शेतमालाची त्यावेळची (रिअल टाईम) माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे सोपे होणार आहे. पुढील काळात या माहितीची बाजारपेठेशी जोडणी (मार्केट लिंकेज) करण्यात येणार असून त्यामुळे या महिलांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यासह पर्यायाने अधिक बाजारभाव मिळणार आहे.
‘ई बिझनेस’ उपक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक महिला कार्यकर्ती राहणार असून या महिलेकडे स्मार्ट फोनवरील ई-बिझनेस ॲप व्दारे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये गावातील विविध उत्पादनांची माहिती या मध्ये भरण्यात येणार आहे. बाजाराच्या मागणीनुसार कोणते उत्पादन कोणत्या बाजारपेठेत पाठवायचे तसेच कोणते विक्रेते किंवा संस्था हा माल विकत घेण्यास तयार आहेत याची माहिती माविम जिल्हा कार्यालयामार्फत घेण्यात येईल. थोडक्यात गावातील महिला प्रत्यक्षपणे जगातील बाजारपेठेशी या माध्यमातून जोडण्याचा माविमचा मानस आहे.
या ऑनलाईन बैठकीत मंत्री ॲड. ठाकूर, माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे आदींनी अमरावती जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून माविमच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची माहिती जाणून घेतली. सचिव श्रीमती कुंदन यांनी महिला व बालकांच्या कल्याणासाठी विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम गतीने राबविण्यात येतील असे सांगितले. अमरावती व ठाणे जिल्हयामध्ये माविमने या उपक्रमाची यशस्वी प्रायोगिक चाचणी केली व शेळी तसेच भाजीपाल्याकरिता खरेदीदार मिळवून दिले, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांनी दिली.
ई- बिझनेस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती उत्पादनाचे बाजारपेठेशी ई- लिंकेज झाल्यामुळे बचत गटाच्या शेतकरी महिला सदस्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळणार आहे. त्यांच्या उत्पादनांना अधिक बाजारभाव मिळणार असून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासह त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल – ॲड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
माविमने यापूर्वी बचत गटाच्या महिलांकडून उत्पादित होत असलेल्या उत्पादनांची आधाररेखा माहिती (बेसलाईन डेटा) जमा केली जात होती. मात्र, आता वेळोवेळी अद्ययावत माहिती या ई- प्लॅटफॉर्मवर भरण्यात येणार असल्याने उत्पादनांना वेळेत बाजारपेठ आणि योग्य दर मिळू शकणार आहे. यापुढील काळात बचत गटांकडून उत्पादित कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंनाही बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे ई- व्यासपीठ निर्माण करण्यात येईल. – श्रीमती ज्योती ठाकरे