चिंचवड,दि.12 सप्टेबंर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ‘प्लास्टिक कॅरिबॅग्ज’चा पुनर्वापर सुरू झाला आहे. बाजारपेठा, सिग्नल चौक तसेच सार्वजनिक ठिकाणी खुलेआम विक्री सुरू आहे. महापालिका स्तरावर नियुक्त अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत आहेत. अशा कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी. ‘प्लास्टिक कॅरिबॅग्ज’चा वापर रोखण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण विकास मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात सौंदणकर यांनी मंत्री ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोविड 19 काळातील लॉकडाऊन कालावधीत राज्य शासनाने बंदी घातलेली असताना काही कॅरिबॅग्ज उत्पादीत करणा-या कंपन्यांनी पुन्हा उत्पादन सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. लॉकडाऊनमधून सरकारने व्यावसायिकांना सूट दिल्यानंतर बाजारात प्लास्टिक कॅरिबॅग्जचा वापर पुन्हा सुरू झाला आहे. यातून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ‘प्लास्टिक कॅरिबॅग्ज’वर राज्य शासनाने घातलेल्या बंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन होत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ‘प्लास्टिक कॅरिबॅग्ज’ वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाद्वारे कारवाई केली जात नसल्यामुळेच बाजारात ‘प्लास्टिक कॅरिबॅग्ज’ची विक्री करणा-या व्यावसायिकांना अभय मिळत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्वाच्या चौकांमध्ये, सिग्नलच्या समोर तसेच बाजारपेठा आदी सार्वजनिक ठिकाणी’ प्लास्टिक कॅरिबॅग्ज’ विक्री केल्या जात आहेत.
भविष्यात याचा अतिरेक रोखणे कठीण जाणार असून आरोग्याला घातक असे वातावरण तयार होणार आहे. वेळीच याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाला आपण पुनर्आदेश द्यावेत. कारवाईस टाळाटाळ करणा-या प्रशासकीय अधिका-यांवर कडक कारवाई करावी. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टिक कॅरिबॅग्ज उत्पादीत करणा-या कंपन्यांवर त्वरीत बंदी घालावी. बाजारातील प्लास्टिक कॅरिबॅग्जचा वापर रोखण्यात यावा, अशी मागणी सौंदणकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्वीच्या कडक अंमलबजावनीमुळे पर्यावरणाची हाणी टळली
पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत स्तरावर देखील या आदेशाची काटेकोर अंमलबजावनी झाली. त्यामुळे ‘प्लास्टिक कॅरिबॅग’ वापराला आळा बसला. परिणामी, पर्यावरणाची हाणी टळली. यंदाच्या पावसाळ्यात नाले तुंबण्याचे प्रमाण अगदीच कमी आढळून आले. यातून ‘प्लास्टिक कॅरिबॅग’चा वापर होण्यास आळा बसल्याचे फायदे दिसून आले. परंतु, आता ‘प्लास्टिक कॅरिबॅग’चा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. याला प्रतिबंध घालण्याची गरज आहे.