नवी दिल्ली,,दि.17 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) उच्चस्तरीय सत्रामध्ये आज बीज भाषण झाले. कोविड-19 महामारीच्या जगभर झालेल्या उद्रेकामुळे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने यंदा दि. 17 जुलै,2020 रोजी या आभासी सत्राचे आयोजन केले.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळामध्ये 2021-22 या वर्षासाठी अस्थायी सदस्य म्हणून दि. 17 जून 2020 रोजी भारताची निवड झाली, त्यानंतर पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राच्या ‘ECOSOC’ सत्रामध्ये केलेले आजचे पहिलेच भाषण आहे.
यंदाच्या ‘ईसीओएसओसी’च्या उच्चस्तरीय सत्रामध्ये ‘‘ कोविड-19 नंतरचा बहुराष्ट्रवाद : 75 व्या वर्धापनदिनी आपल्याला कशा संयुक्त राष्ट्रांची गरज आहे ’’ या संकल्पनेवर चर्चा करण्यात आली.
संयुक्त राष्ट्राचा 75 वा वर्धापनदिन यंदा येत आहे आणि यानिमित्ताने निवडलेल्या संकल्पनेलाच योगायोगाने भारतानेही आपल्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यपदी असताना प्राधान्य दिले आहे. कोविड-19 नंतरच्या जगामध्ये सुधारित बहुराष्ट्रवादाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. यामध्ये समकालीन जगाचे वास्तविक प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी, ECOSOC-संयुक्त राष्ट्र संघटनेची आर्थिक आणि सामाजिक परिषद तसेच संयुक्त राष्ट्रांच्या विकासकामांसोबत-ज्यात शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचाही समावेश आहे- भारताच्या जुन्या संबंधांचे स्मरण केले. भारताच्या विकासाचे उद्दिष्टही “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” हेच असून कोणीही मागे राहणार नाही, या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी हे सुसंगतच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात, सामाजिक-आर्थिक जीवन निर्देशांकात सुधारणा करण्यात आलेल्या यशाचा मोठा परिणाम, शाश्वत विकास उद्दिष्टांवर झाला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. विकसनशील देशांना त्यांची शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सहाय्य करण्याबद्दलच्या भारताच्या कटिबद्धतेचाही त्यांनी उल्लेख केला.
भारताच्या सध्या सुरु असलेल्या विकासाच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी माहिती दिली. ‘स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जनतेला सार्वजनिक स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न, महिलांचे सक्षमीकरण, वित्तीय समावेषण आणि गृहनिर्माण तसेच आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यासाठी, “सर्वांसाठी घरे” आणि ‘आयुष्मान भारत’ सारख्या पथदर्शी योजना सरकार राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणस्नेही शाश्वत विकास आणि जैव-विविधतेचे संरक्षण याकडे भारताने लक्ष केंद्रित केले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य आणि आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडी उभारण्यात भारताने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी यावेळी स्मरण केले.
आशियाई प्रदेशात, कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात पहिल्यांदा भारताने प्रतिसाद दिल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी यांनी सरकार आणि भारतातील औषधनिर्माण कंपन्यांनी विविध देशांमध्ये औषध पुरवठा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच, सार्क देशांमध्ये समन्वय साधून एक संयुक्त प्रतिसाद धोरण तयार करण्यासाठीही भारताने पुढाकार घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
ECOSOC मध्ये पंतप्रधानांचे हे दुसरे भाषण होते. याआधी जानेवारी 2016 साली ECOSOC च्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे बीजभाषण झाले होते.