कोल्हापूर,दि.18 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कोरोनाचा वाढता सामुहिक संसर्ग पाहता जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. आज सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारपासून (20 जुलै) सात दिवस (27 जुलै) पर्यंत जिल्ह्यात 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ दूध पुरवठा आणि औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
लाॅकडाऊन सुरू करण्यावरुन तीन दिवसांपुर्वी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात विरोधाभास दिसुन आला होता. त्यानंतर मुश्रीफ यांनी स्वत: घरी लाॅकडाऊन होऊन आठवडाभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता सामुहिक संसर्ग पाहता अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लाॅकडाऊन करण्याची मागणी केली होती. काही गावांत स्थानिक प्रशासनाने स्वत: लाॅकडाऊन सुरू केले होते.
आज पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील खासदार,आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष नगराध्यक्ष, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ काॅन्स्फरन्सद्वारे आज बैठक घेतली. बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यात 19 कोव्हीड केंद्रात 2 हजार 338 खाटांची तयारी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून,दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यात 19 ठिकाणी कोव्हीड काळजी केंद्रातून 2 हजार 338 खाटांची सोय करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य आधिकारी डॉ.दिलीप पाटील, नगरपालिका क्षेत्रात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी-पाटील आणि ग्रामीण भागासाठी आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
आज विक्रमी 222 रूग्णांची नोंद
आज सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात आतापर्यंत उच्चांकी असे 222 नवे कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत बाधीतांची संख्या एकुण 1 हजार 860 वर पोहोचली होती. शाहुवाडी पाठोपाठ इंचलकरंजीसह कोल्हापूर शहरातही बाधीतांची संख्या दोनशे पार झाली आहे. सर्वत्र सामुहिक संसर्ग वाढत असल्याने, कोल्हापूरकरांची धास्ती वाढली आहे. दरम्यान शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या डाॅक्टरांचा अहवालही कोरोना पाॅझीटिव्ह आल्याने, संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे.आज दिवसभरात 23 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज आणखी दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत इंचलकरंजीचे असुन, आतापर्यंत 42 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण 847 बाधीतांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.