Home ताज्या बातम्या आज(दि.२२ मार्च) मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज(दि.२२ मार्च) मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू

घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा

शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचारी, बँका, वित्तीय संस्था सुरु

मुंबई,दि. २२ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.आज रेल्वे मंत्रालयाने देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे याची ग्वाही दिली.

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर

राज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहे, रेल्वे , खाजगी आणि एस टी बसेस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा, करणारी केंद्रे सुरुच राहतील हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्याची अजिबात कमतरता नाही तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत, त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका, अजिबात घाबरून जाऊ नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वंयशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणुमुळे आपण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्यातरी सर्वांच्या परिक्षेचा कठीण काळ आता सुरु झाला आहे. सर्वांनी स्वंयशिस्तीने, सांगितलेले स्वच्छतेचे आणि इतर नियम पाळून वागण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे, यापुढे ही ते कायम राहू द्या असेही ते म्हणाले. यातूनच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्याचा फैलाव रोखणे शक्य आहे. या प्रादुर्भावाचा गुणाकार आपल्याला समाजात होऊ द्यायचा नाही तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याची वजाबाकी करून त्याला हद्दपार करायचे आहे असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वप्रथम आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आज जनता कर्फ्यू आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि उद्या कसेही वागायला, फिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थिती मध्ये पोहोचलो आहोत. गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतांना दिसते आहे. ही संख्या कमी नाही तर थांबवायची असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर न पडणे यासारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.

घराल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये

आजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून नागरिक, आपले कुटुंबिय आले आहेत. आता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याची, प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची चांगली संधी आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे. परंतू परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबियांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये, किमान 15 दिवस बाहेर जाऊ नये, आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर रहावे असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.

ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांनी काही लक्षणे आढल्यास डॉक्टरांना भेटावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत याची जाणीव करून देतांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ही शांतता आणि संयम आपल्याला 31 तारखेपर्यंत ठेवायची आहे असेही त्यांनी सांगितले.

विषाणू जातपात पाहत नाही

आपण मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे बंद केली. कारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जातपात, धर्म पहात नाही. कोणताही देश या संकटातून सुटला नाही.म्हणूनच आपण अनेक खाजगी कार्यालये, आस्थापना यांना कामगारांची, कर्मचाऱ्यांची उप‍स्थितीची संख्या कमी करायला सांगितली. वर्क फ्रॉम होम असे सांगितले. पण हाच कर्मचारी आणि कामगारवर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यांना जपा, माणूसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version