गडचिरोली,२२ मार्च२०२० (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :-कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यात बहुतांश भागात नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या बंदमधून खाद्य पदार्थांची किंवा वस्तुंची दुकाने (किराणा), दूध, अंडी, ब्रेड, भाजीपाला व औषधीची काही दुकाने बंद आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज अहेरी, आलापल्ली बंदलाना गरिकांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचबरोबर गाव खेड्यात सुद्धा या बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने आज 22 मार्चला जनतेनी सहकार्य करून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरीच राहावे अशा पद्धतीची कळकळीची विनंती त्यांनी प्रसार माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या जनतेला केलेली होती. तेव्हा जनतेने सुद्धा शासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, भामरागड , मुलचेरा, सिरोंचाला येथील नागरिकांनी आज बाजारपेठा बंद ठेवून या बंदला पूर्ण प्रतिसाद दिलेला आहे.या वेळी शहरांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला होता.पोलीस सायरन वाजवून नागरिकांना कर्फ्युमध्ये बाहेर पडू नये असा इशारा देत होते. अहेरी आगारमधून जाणाऱ्या बसेस ही बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे जिकडेतिकडे निर्मनुष्य रस्ते ओसाड दिसत होते.