भटक्या विमुक्तांना इदाते कमिशनच्या शिफारशी लागू करा-संजय कदम
पिंपरी,दि. 22 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी 2016 साली भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजासाठी ‘दादा भिकू इदाते कमिशन’ नेमले होते. या कमिशनने सादर केलेला अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यातील शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात. या प्रमुख मागणीसाठी तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चा’ (नियोजित) या संस्थेच्या वतीने मंगळवारी (दि. 25) राज्यव्यापी क्रांतीमोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय मारुती कदम यांनी दिली.पिंपरी येथे शनिवारी (दि. 22) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. कैलास भोसले, अविनाश इंगळे, संतोष कदम, शामराव वाकोडे, बलराज काटे, शाहिर श्रीकांत रेणके, भारत भोसले, अंकुश भोरे, सोमनाथ इंगळे आदी संस्थेचे राज्यस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी संजय कदम म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे झाली. तरी देखील राज्यातील साडेचार कोटी व देशातील तीस कोटींहून जास्त भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज आजही भटकेच जीवन जगत आहेत. केंद्रात व राज्यात अनेक पक्षांचे सरकार आले व गेले. परंतू भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाला कोणतेही सरकार न्याय देऊ शकले नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन स्वत:ला पुरोगामी विचाराचे मानणा-या पक्षांनी व प्रतिगामी देखील या समाजाला न्याय हक्कापासून वंचित ठेवले. पुरोगामी विचारांचा वसा घेऊन राजकारण करणा-या राज्यातील एकाही पक्षाने भटक्या विमुक्त समाजाला विधानसभेत प्रतिनिधीत्व दिले नाही. तीच परिस्थिती देशपातळीवर आहे. भटक्या विमुक्त समाजाचा एकही खासदार नाही. हा समाज पारंपरिक पध्दतीने आपले जीवन व्यथित करीत असून शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, उद्योग, व्यापार यापासून या वंचित समाजाला न्याय मिळावा. राष्ट्रीय स्थरावर या समाजाला ‘DNT’ (डि नोटिफाईट ट्राईब) या स्वतंत्र्य कॅटेगरीत स्थान मिळावे. केंद्रीय अर्थसंकल्पात या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वतंत्र्य 25 हजार कोटींच्या निधीची तरतूद करावी. भटक्या सामाजाच्या 217 जाती आहेत. त्यांना शैक्षणिक, व्यवसायीक मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेचे स्वतंत्र्य विद्यापीठ स्थापन करण्याचे नियोजन आहे. त्याचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. या नियोजित विद्यापीठासाठी केंद्राकडून 100 एकर जमीन व आर्थिक सहाय्य मिळावे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय नोक-यांमध्ये असणारे एनटीबीचे आरक्षण वाढवून मिळावे व त्या जागा ताबडतोब भराव्यात. महाराष्ट्रात ‘वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जनजाती महामंडळ’ अंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मागील सरकारने या महामंडळाला 300 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. परंतू त्याची अमंलबजावणी झाली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच महामंडळाचे नाव बदलून ‘बहुजन विकास कल्याण विभाग’ असे केले. हा एक प्रकारे भटक्या समाजावर अन्याय आहे. या सरकारने भले नाव बदलले तरी अनुदान द्यावे व भटक्या समाजाला उद्योग, व्यवसायासाठी, नोकरीत आरक्षण, राजकीय आरक्षण, वाढीव शैक्षणिक आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी पिंपरीत होणा-या भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चात राज्यभरातून 10 हजारांहून जास्त समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. यामध्ये समाजबांधव आपली पारंपरिक वेषभूषा व वादय, मशाल, तिरंगा झेंडा, भारतीय संविधानाची प्रतिकृती घेऊन सहभागी होणार आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता आकुर्डी खंडोबा माळ मंदीर येथून पुणे मुंबई महामार्गाने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत क्रांतीमोर्चा काढणार आहेत. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. अशीही माहिती संजय कदम यांनी दिली.