मुंबई,दि 9 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे (NRC) समर्थन केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून राज यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी मनसेचे इंजिन भाजपला भाड्याने दिल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.
राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच. भूमिका केवळ वैयक्तिक नफा- नुकसान पाहून घेतल्या की मग मोर्चे काढा वा चिथावणीखोर भाषणे करा जनतेच्या दृष्टीने त्यांची किंमत शून्य असते.भाजपाच्या “धार्मिक-द्वेष एक्स्प्रेस” करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिले पण इथेही ते फेल होईल, असेही सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे मनसेकडून आता या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. गिरगावातील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व राज ठाकरे यांनी केले. यानंतर राज ठाकरे यांनी आझाद मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.यावेळी राज यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) आंदोलन करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. सध्या आम्ही मोर्चाला मोर्च्याने प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यापुढे जास्त नाटकं कराल तर दगडला दगडाने आणि तलवारीला तलवारीने प्रत्युत्तर देऊ, असे राज यांनी म्हटले होते. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात CAAच्या अंमलबजावणीसाठी राज ठाकरे भाजपला पाठिंबा देणार, हे स्पष्ट झाले आहे.