मंबई,दि.30 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-“मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे.” अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना शपथ दिली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण २५ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये आदित्य ठाकरेंचाही समावेश होता.
राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर अखेर महिन्याभरानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.
यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे. राजकीय वारसदार असलेल्या अनेक नेत्यांच्या मुलांना ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. यापैकी आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. ते निवडणुक जिंकल्यानंतर तर वरळीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्सही लागले होते. मात्र अनुभव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून संमती दर्शवली. त्यानंतर उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. असं असलं तरी पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही आदित्य यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
आदित्य यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. काळ्या रंगाच्या सफारीमध्ये आदित्य ठाकरे शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आले होते. आदित्य यांनी शपथ घेताना आपल्या आईचे म्हणजे रश्मी ठाकरे यांचे नाव आवर्जून घेतले. राश्मी यांनीही आदित्य यांची शपथ घेऊन झाल्यानंतर टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. आदित्य यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांनाही टाळ्या वाजवून ज्येष्ठ बंधू मंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शपथ घेतल्यानंतर आदित्य यांनी सह्या केल्या. त्यानंतर ते कोश्यारी यांच्या जवळ गेले आणि ते कोश्यारी यांच्या पाया पडले. त्यानंतर कोश्यारी यांनी आदित्य यांच्या पाठीवरुन हात फिरुन हस्तांदोलन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कोश्यारी यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आदित्य यांनी मुख्य मंचाकडे जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या शुभेच्छा घेतल्या.
आदित्य यांच्याबरोबरच राजकीय घरण्यांमधून निवडून आलेल्या अमित देशमुख, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, आदिती तटकरे आणि शंकरराव गडाख यांचाही मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. आदित्य यांनी वरळीमधून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. वरळी विधानसभा मतदारसंघतून आदित्य यांना ८९,२४८ मते मिळाली. तर त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांना २१,८२१ आणि बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांना ७८१ मतं मिळाली.