पुणे,दि.२१डिसेंबर २०१९(प्रजेचा विकास आॅनलाईन न्युज प्रतिनिधी):-
हिंदू किंवा मुस्लिम असा भेद न करता बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या घुसखोरांना हाकलवून द्यायला पाहिजे. इतर देशांमधील लोकांना सामावून घ्यायला भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शविला. ते शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारण कायद्याविषयी भाष्य करताना म्हटले की, भारताला अगोदरच कमी चिंता नाहीत. आपल्याकडे प्रचंड लोकसंख्येमुळे अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. त्यामुळे जे इथे आहेत त्यांचीच सोय लागत नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारला CAA ची नवी टुम काढण्याची गरज काय होती, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारने हिंदू किंवा मुस्लिम असा भेद न करता बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या घुसखोरांना हाकलवून द्यायला पाहिजे. आपला देश या लोकांची सोय लावण्यासाठी नाही. जगात केवळ भारतानेच माणुसकीचा ठेका घेतलेला नाही, असेही राज यांनी सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलकांकडून घेण्यात आलेल्या हिंसक भूमिकेवरही टीका केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजे देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठीची सरकारची खेळी आहे. केंद्र सरकारने हा कायदा आणून गोंधळ वाढवण्याची गरज नव्हती. मात्र, इतर राजकीय पक्षांनीही या मुद्द्याचे राजकारण करता कामा नये. देशातील मुस्लिमांनीही या कायद्यामुळे असुरक्षित वाटून घेण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसलमान राहतात. मात्र, ते बऱ्याच काळापासून याठिकाणी राहत आहेत. त्यांची रोजीरोटी आणि इतर गोष्टी त्या परिसराशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते दंगल वैगैर करून अशांतता पसरवणार नाहीत, असा दावा राज यांनी केला.