नविदिल्ली,दि.9 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची महत्वपूर्ण बैठक नविदिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथील सभागृहात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत आज पार पडली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत रिपाइं ( आठवले ) या नवीन नोंदणीकृत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची निवड करण्यात आली.या बैठकीत रिपाइं ( आठवले) या नवीन नोंदणीकृत पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील सदस्य मोहिमेला प्रारंभ करण्यात आला असून या वेळी पहिल्या टप्प्यात देशभरात रिपाइं( आठवले) पक्षाचे 1 कोटी सदस्य बनविण्याचा निर्धार रिपाइं ( आठवले ) चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक बांधणी कडे लक्ष देणार असून सर्व जाती धर्माच्या लोकांना रिपाइं( आठवले) पक्षात स्थान देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक प्रबळ असा रिपब्लिकन पक्ष साकार करणार असल्याचा निर्धार रिपाइं( आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या नोंदणीकृत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ना. रामदास आठवले तर राष्ट्रीय सरचिटणीस पदी अविनाश महातेकर ; राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी एम डी शेवाळे; राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आदिकेशवन ( तामिळनाडू) अतिरिक्त सरचिटणीस पदी वेंकट स्वामी ( कर्नाटक )लखमेन्द्र खुराणा यांचा रिपाइं ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये समावेश आहे. रिपाइं आठवले या पक्षाच्या वाढीसाठी देशभरात अभ्यासशिबिर; कार्यकर्ता मेळावे;प्रशिक्षण शिबीर; आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती रिपाइं( आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.
रिपाइं आठवले या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमिल ची जागा हस्तांतरित करून तेथे स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरू झाले. महू येथील भीमजन्मभूमी स्मारक; नवी दिल्लीतील 26 अलीपुर रोड या निर्वाणभूमीवरील भीमरायाचे स्मारक; डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर; तसेच लंडन मधील हेन्री रोड वरील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाचे स्मारक आदी अनेक भीमस्मारकांची कामे पंतप्रधानांनी
मार्गी लावली. मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय; ऍट्रोसिटी कायद्याला अधिक मजबूत करण्यासाठी केलेली अमेंडमेण्ट; जम्मू काश्मीर च्या विकासासाठी कलम 370 हटविण्याचा निर्णय; मुस्लिम महिलांना न्याय देणारा तिहेरी तलाक चा नवीन कायदा संसदेत संमत केला. तसेच उज्वला; मुद्रा; पंतप्रधान आवास योजना; आयुष्यमान भारत योजना; स्वच्छ भारत अभियान आदी अनेक बहुऊपयोगी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केल्या. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन करणारा ठराव आज रिपाइं ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली. देशात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चित योग्य उपाययोजना करतील आणि देशातून आर्थिक मंदी हद्दपार होईल असा विश्वास रिपाइं आठवले पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्त करण्यात आल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली आहे.