मुंबई,दि.23नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ आज सकाळी पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या.
महाराष्ट्रातील राजसत्तेचे शिवधनुष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पेलणार असल्याचे स्पष्ट संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.
मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले.
फडणवीस म्हणाले, की जनादेश आम्हाला महायुती म्हणून मिळाले होते. आम्ही एकमेकांना काय वचन दिले हे पाहण्यापेक्षा जनतेला दिलेले वचन महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत येण्यापेक्षा दुसऱ्यासोबत जाणार असल्याने आम्हाला हा निर्णय घेतला. मी मोदी, अमित शहा यांचे आभार मानतो.
स्थिर सरकारसाठी घेतला निर्णय : अजित पवार
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसोबत चर्चा संपतच नव्हती. त्यामध्ये नको त्या गोष्टीची मागणी वाढत चालली होती. राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी यासाठी हा निर्णय मी घेतला.