मुंबई,दि.10 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शिवसेनेने सोबत येण्यास नकार दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी संध्याकाळी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, संख्याबळाअभावी भाजपने हे निमंत्रण नाकारले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजप, शिवसेना, रिपाई, रासप आणि रयत क्रांती अशा महायुतीने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. जनेतेने महायुतीला भरघोस जनादेशही दिला होता.मात्र, शिवसेनेने जनमताचा अनादर करत सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने सरकार न स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.रविवारी दुपारी मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपचे राज्य प्रभारी भुपेंद्र यादव, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि आशिष शेलार हे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्व नेते राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या निर्णयाबद्दलची माहिती दिली.
भाजपच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कमालीची बदलणार आहेत. यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केल्यावर शिवसेना सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेईल, असे म्हटले होते. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची साथ देणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.
तत्पूर्वी आज सकाळीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द रिट्रिटी रिसॉर्टमध्ये जाऊन पक्षाच्या आमदारांची भेट घेतली होती. यावेळी आपण शिवसैनिकाला मुख्यमंत्र्यांच्या पालखीत बसवणारच, असा निर्धार व्यक्त केला होता. तर दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनी एकमुखाने शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना केली आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यामुळे आगामी काही तासांमध्ये काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.