Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीचे छ.उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीचे छ.उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली,दि१४ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वशंज व
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आपल्या खासदारकीचा राजीनामा मध्यरात्री दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजवरचा सर्वात मोठा भूकंप झाला असून, राष्ट्रवादीची सातारा जिल्ह्यात पडझड होणार आहे.”राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो. हीच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच मनोमन इच्छा. तुमच्यासाठी कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेन..”असेही उदयनराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
गेले अनेक दिवस उदयनराजे पक्षांतरामुळे चर्चेत होते. मात्र, तळ्यातमळ्यात त्यांची अवस्था होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दोन वेळा भेटले. त्यानंतरही त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय होत नव्हता. उदयनराजे व भाजप यांच्यामध्ये अटी, शर्तींची चर्चाही सुरू होती. त्यानंतर उदयनराजेंनी शेवटचे धक्कातंत्र वापरत माधव बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार, उदयनराजे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आ. शशिकांत शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. पवारांना भेटत त्यांचे आशीर्वाद घेऊन उदयनराजे बाहेर पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी त्यांचे फोनवर बोलणे झाले आणि दि. १४ सप्टेंबरचा मुहूर्त निघाला. धक्कातंत्रात माहीर असलेल्या उदयनराजेंनी शुक्रवारी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीने थेट दिल्ली गाठली.
यावेळी उद्यनराजे म्हणालेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव स्थापित केला. त्यानुसार देश पुढे चालू आहे. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मोदी शाह पुढे जात आहेत. प्रत्येक राज्यांत भाजपची प्रगती होत आहे.त्याचे कारण हेच आहे. मी लहान असल्यापासून काश्मीरचा मुद्दा ऐकतोय. त्याकडे कोणी नीट पाहीले नाही. देश एकत्र कसा राहील, अखंडता टिकून कशी राहील, यासाठी भाजप सरकारने पाऊल उचलले. हा निर्णय एकदम योग्य आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी काश्मीर मुद्द्यांवर भाजपला पाठिंबा दिला. प्रवेश करण्याचे कारण काश्मीर प्रश्न सोडवला, असल्याचे सांगितले.साताऱ्यात राष्ट्रवादीचे एकहाती सत्ता होती. या सत्तेला आता सुरुंग लागणार आहे. भाजपने उदयनराजे भोसले यांना गळाला लावून पश्चिम महाराष्ट्रात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी उदयनराजे भोसले हे एक होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, साताऱ्यात आता पोटनिवडणूक पार पडणार असून ती विधानसभेबरोबर पार पडेल किंवा त्यानंतर हे पाहावे लागणार आहे. परंतु हा गड आपल्याकडे राखणे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. यापूर्वी उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 13 =

error: Content is protected !!
Exit mobile version