रांजणगाव,दि.६ सप्टेबंर २०१९ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी): – कामगारांना धमकावणे,कंपनीवर दबाव आणणे आणि संघटितपणे गुन्हेगारी करणे यासाठी कामगारनेते कैलास कदम यांच्यासह हिंद कामगार संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर मोक्काअंतर्गत कार्यवाही करण्यात आली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी हि कारवाही केली आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात जया मनोज पवार (रा. वडगाव शेरी, पुणे ) यांनी फिर्याद दिली होती, त्यानुसार १६ एप्रिल २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास, रांजणगाव एमआयडीसी येथील एलजी कंपनी येथे कामावर असताना, तेथील कंपनीमधील कामगार चारुदत्त वैद्य, संदीप देशमुख, शिवाजी राठोड, मनोज कुमार पाल, जीवन डंके, विजय मोकले, किशोर पाटील, नीलेश शेलार, सर्जेराव खरात, संतोष खेडकर, अशोक धाडकर, कैलास पटले यांनी कंपनीमध्ये कामगारांची हिंद कामगार संघटना या नावाने युनियन तयार करणार असल्याने युनियनमध्ये येण्यासाठी आग्रह धरला.
युनियनचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या सांगण्यावरून रुपये १०००० रकमेची वर्गणी देण्याची मागणी केली. जे कामगार युनियनमध्ये येणार नाहीत त्यांना आम्ही पाहून घेऊ अशी दमदाटी केली, त्यास फिर्यादीने नकार दिला, त्याच प्रमाणे कंपनीतील कामगार कलीम बाबुलाल शेख, निसार अली, अमोल शिवाजी ठाणगे, इन्द्रमणि लालसिंग चंदेल, पंकज मिश्रा यांना सुद्धा बळजबरीने कंपनीमध्ये युनियन करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे कंपनीमधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम ३८४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपी चारुदत्त मनोहर वैद्य (वय ३९, रा. शिक्रापूर), मनोज कुमार पाल ( वय छत्तीस, रा. काळुबाई नगर वाघोली ), जीवन संजय डंके ( वय ३८, रा. महाबळेश्वर नगर, शिक्रापूर), विजय विठ्ठल मोकळे (वय ३९,रा. दुबे नगर, वाघोली), किशोर संतोष पाटील (वय ३९, रा. पेरणे फाटा), निलेश रमेश शेलार (वय ३७, रा.वाघोली), सर्जेराव अंबाजी खरात (वय ४०, रा.वाघोली), संतोष तुळशीराम खेडकर (वय ३९, रा.चंदन नगर), कैलास प्रेमलाल पटले (वय ३५,रा. वाघोली), संदीप कृष्णराव देशमुख (वय ३८, रा. खराडी), शिवाजी गुलाबराव राठोड (वय ३४,रा.शिक्रापूर) अशोक देवप्पा धाडकर (वय ३७,रा.खराडी) यांनी संघटित गुन्हेगारांची टोळी तयार करून त्या आधारे कैलास महादेव कदम (रा.खराळवाडी, पिंपरी) यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे केले असल्याचे तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे यादव यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस निरीक्षक जयंत मीना, पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांच्यामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेत मोक्का अंतर्गत वाढीव कलम लावण्याकरिता रिपोर्ट पाठवला होता. त्याबाबत पडताळणी करून विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मोक्काअंतर्गत कलम वाढविण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे या गुन्ह्यास मोक्काअंतर्गत वाढीव कलम लावण्यात आलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या पाटील करीत आहेत.
अशाप्रकारे संघटीत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर करण्यात येणाऱ्या कारवाई मुळे औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसेल आणि ज्या कंपन्या स्थलांतरण करत आहेत त्या कमी होऊन उद्योग क्षेत्रातील भरभराटीसाठी पोषक वातावरण तयार व्हायला मदत होईल.