नागपूर ,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण मध्य भारतातून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सुमारे 10 लाख भाविकांसाठी सुरक्षेसह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने येत्या दहा दिवसात कामे पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या.
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल प्रामुख्याने उपस्थित होते. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी अध्यक्ष ॲड.मुकेश शर्मा, उपाध्यक्ष अजय विजयवर्गी, सचिव केशवराव फुलझेले महाराज, श्रीमती सुशिला मंत्री, प्रेमलाल पटेल, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोराडी देवस्थान येथे नवरात्रोत्सवाची 29 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. या उत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या मंदिर परिसराच्या विकासासाठी शासनाने विशेष आराखडा मंजूर केला असून त्यानुसार संपूर्ण कामे अंतिम टप्प्यात आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी कोराडी संस्थानतर्फे आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
विकास आराखड्यानुसार प्रस्तावित केलेल्या विकास कामामध्ये भक्तनिवासाची अद्ययावत इमारत पूर्ण झाली आहे. तसेच भाविकांसाठी बस थांबा, देवी मंदिराचा मुख्य गाभारा, सभा मंडप आदी कामे प्रगती पथावर आहेत. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले असून भाविकांना सहज व सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक सूचना यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
नवरात्रोत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेवून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करताना वाहन व्यवस्था सुध्दा पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावी. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने येण्याची शक्यता लक्षात घेवून त्यानुसार पुरेशी व्यवस्था आवश्यक आहे. याच परिसरात भाविकांसाठी मदत केंद्र, पोलीस चौकी सुरु करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी केल्या.
भाविकांना दर्शनासाठी तीन प्रवेशव्दार राहणार आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. संपूर्ण परिसरात महाजेनकोतर्फे पथदिवे, पाच हायमॉस टॉवर आदी बसविण्यात येतील. याच परिसरात चोवीस तास आरोग्य पथक तैनात करण्यात येणार असून अॅंब्यूलन्सची सुविधा, भाविकांसाठी चोवीस तास पिण्याचे पाणी, परिसराच्या स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती, शौचालय आदी सुविधा कोराडी ग्रामपंचायत, श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महाजेनको, महसूल विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने पूर्ण करण्यात येणार आहेत.
यावेळी संस्थानचे विश्वस्त व कोषाध्यक्ष बाबूराव भोयर, ॲड. डी.जी. चन्ने, नंदूबाबा बजाज, स्वामी निर्मलानंद महाराज, दयाराम तडसकर, अशोक हानोरकर, दत्तू समरितकर, डॉ. नंदिनी त्रिपाठी, प्रभा निमोने, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.