Home ताज्या बातम्या पालकांनो सावधान मुलांना कुठले शिक्षण देताय ? -डॉ. दत्ता कोहिनकर ...

पालकांनो सावधान मुलांना कुठले शिक्षण देताय ? -डॉ. दत्ता कोहिनकर माईंड पॉवर ट्रेनर

0

पुणे,दि.२६ आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास प्रतिनिधी):-

पालकांनो सावधान
मुलांना कुठले शिक्षण देताय ?
-डॉ. दत्ता कोहिनकर
माईंड पॉवर ट्रेनर
9822632630
 कुटूंबातील आई-वडलांनी उपाशी राहून आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलही अभ्यासात हुषार दोघांनी शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च पदावर नोकरी मिळवली. अमेरिकेत आपले मजबूत बस्तान बसवले. दोघांनीही अमेरिकन मुलीशी लग्न करून तेथेच संसार थाटला, आता त्यांचे भारतात येणं दुर्मिळ झालं.  अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहचली. धाकटा मुलगा उशीरा, सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहचला. दोन दिवस थांबून त्याने वडलांच्या हातावर एक लाख रूपये ठेवले व त्यानंतर म्हणाला ‘‘बाबा मी निघतोय, आज रात्रीची फ्लाईट आहे.’’ 
दुःखी कष्टी बाबा न राहवून बोलले, ‘‘अरे तू आलास पण तुझा दादा ?’’ त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, ‘‘त्याचं काय आहे बाबा, मी दादाला फोन केला होता, मात्र वर्कलोड जास्त असल्याने त्याला येणे शक्य नव्हते.’’ तोच म्हणाला, ‘‘यावेळी तू जा-बाबांच्या वेळी मी जाईन.’’ बाबा आतल्या आत उन्मळून पडले. डोळयांतून अश्रुच्या धारा वाहू लागल्या. उच्चशिक्षण मी दोनही मुलांना देऊ शकलो पण कर्तव्य व माणूसकीचे अर्थात नैतिक मूल्यांचे शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही या विचारांनी त्यांचे अंतःकरण उव्दीग्न झाले
पूर्वी लोक कमी शिकलेली होती. वाडयात एका घरात एखादी व्यक्ती देवाघरी गेली (मयत झाली) तर सगळया वाडयात सुतक असायचे. कोणीही आपल्या घरात रेडिओ देखील लावत नसत. ज्या घरात मयत झाली त्या घरातील लोकांना शेजारी-पाजारी, न्याहारी, भोजन आणून खावयास लावत व मयताच्या सगळया विधीमध्ये वाडयातील लोकांचा सहभाग असे. वाडा हेच एक कुटूंब असतं. आज लोक खूपच शिकतात. पण खालच्या मजल्यावर मयत झाली असेल तर चौथ्या मजल्यावर दार बंद करून श्रीखंड – पुरीचे जेवण चाललेले असते. दुःख सावरायला येणार कोण ? दरवाज्यावर मोठमोठया पदव्या असतात पण दरवाजे आतूनच बंद असतात. बिल्डींगमधील लोकांची नावे पण बर्‍याच जणांना माहीत नसतात, असे शिक्षण काय कामाचे ? 
आज मुलांना चारित्र्य घडवणारे व मानसिक बल वाढवून, बुद्धी विशाल करणारे, नैतिक मूल्य जोपासणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामुळे करूणा – मैत्री – मुदीता – उपेक्षा – निःस्वार्थ वृत्ती उदयास येते ,असे शिक्षण आज लुप्त झाले आहे. 
माणसाच्या मनात दुसर्‍याविषयी आदर -सेवाभाव – मैत्री निर्माण करून माणसाने – माणसाशी – माणसाप्रमाणे वागण्याच्या शिक्षणाची आजच्या पिढीला गरज आहे. कृतज्ञता जागवणारे शिक्षण आज दिले गेले पाहिजे. 
एक तारखेला पगार घेणे व आयुष्यभर दाराला आतुन कडी लावून घेणे, रस्त्यावर कोणी चक्कर येऊन पडला तरी मला काय घेणे आहे,  या विचारसरणीचे उच्चाटन करणारे शिक्षण आजच्या शाळेत शिकवायला हवे. कर्मवीर भाऊराव  पाटील मुलांना झोपडी बांधायला शिकवत, स्वयंपाक करायला, शब्दकोश पाहायला शिकवत, रविंद्रनाथ टागोर विदयार्थ्यांना नम्रपणे सर्व प्रकारची कामे करायला शिकवत. इंदिरा गांधीना टागोरांच्या संस्थेत पाठवताना नेहरूंनी टागोरांना कळवले होते, ‘‘तिला हाताने काम करू दया, डोळयाने जग पाहू दया मनाने विचार करू दया. माझी मुलगी म्हणून कुठल्याही प्रकारची सवलत तिला देऊ नका.’’ 
अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता, माझ्या मुलाला जगात कसं जगायचं व विषम परिस्थितीत कस वागायचं हे शिकवा असा आग्रह केला होता. 
आज जास्त शिकलेली लोक भौतिक जगात अन्यायाविरूध्द दंड थोपटण्यास पुढे येत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे  – ते जो पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’’ 
म्हणून निस्वार्थता, सेवाभाव, चारित्र्य, नैतिकता, संघभावना, देशप्रेम, शुध्दता,कर्तव्यभावना, करूणा, मैत्री, कृतज्ञता यांचे संमिश्र शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी चित्त शुध्द करा. ‘मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥’’ असे स्वाभिमानपूर्वक सांगणारे तुकाराम महाराज देखील आवाहन करतात, ‘‘सकळांच्या पाया माझे दंडवतआपले चित्त शुध्द कराll .’’ या चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज आहे मुलांना नैतिक मुल्ये शिकवा , त्यासाठी विपश्यना ध्यान साधना करा. वेबसाईड 👇
website..www.vridhamma.org.
( मी लिहलेल्या”मनाची मशागत” या पुस्तकाला बेस्ट सेलरचा दर्जा मिळाला आहे .)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × four =

error: Content is protected !!
Exit mobile version