पिंपरी, दि.२२ आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – पिंपरीतील योद्धा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सव रद्द करुन कोल्हापुरातील बानगे येथील कॉ. जीवनराव सावंत श्रमिक विद्यालय आणि कागल तालुक्यातील करनूर येथील 200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप ढेरंगे आणि संयोजक शेखर ओव्हाळ म्हणाले की, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितिमुळे अवघा महाराष्ट्र मदतीसाठी सरसावला असून पिंपरीतील योद्धा प्रतिष्ठाननेही याकामी पुढाकार घेतला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. मात्र , कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांची बिकट परिस्थिती पाहून हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासाठी होणारा खर्च कोल्हापुरच्या कागल तालुक्यातील बानगे गावातील कॉ. जीवनराव सावंत श्रमिक विद्यालयात शिकणाऱ्या १५० आणि कागल तालुक्यातील करनूर येथील ५० अश्या दोनशे मुलांना शैक्षणिक मदत देण्याचा निर्धार केला. या उपक्रमासाठी योद्धा प्रतिष्ठानचे संयोजक शेखर ओव्हाळ युवा मंच व संदिप ढेरंगे मित्र परिवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.