शिर्डी(७जुन२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंदिर परिसरातील साई सत्यव्रत हॉलचे पहिल्या मजल्यावर ध्यानमंदिर बांधकामाचा शुभारंभ संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वस्त सर्वश्री बिपीनदादा कोल्हे, अॅड.मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, सौ.नलिनी हावरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.हावरे म्हणाले की, आजपर्यंत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने अनेक उपक्रम राबविले गेलेले आहे. या उपक्रमांमध्ये ध्यानमंदिर उभारणे हा एक अनोखा असा उपक्रम आहे. साईंची शिर्डी नगरी ही नेहमी गजबजलेली असते. अशा या गजबलेल्या ठिकाणी ज्या साईभक्तांना १० ते १५ मिनिटे ध्यान करायची अशी शांततामय जागा नव्हती. त्यामुळे साईभक्तांकडून अनेक दिवसांपासुन ध्यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. म्हणूनच समाधी स्थानाला लागुनच असलेल्या परिसरात साईभक्तांना ध्यानासाठी ध्यानमंदिर उभारण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या ध्यानकेंद्रात १२५ साईभक्त ध्यानासाठी बसू शकतील. हे ध्यानकेंद्र साऊंड प्रुप व वातानुकुलित असे असेल जेणे करुन त्याठिकाणी शांतता निर्माण होवून भक्तांना ध्यान करता येईल. यामुळे साईभक्त शिर्डीतुन जाताना भक्तीभाव आणि शांतता घेवुन जातील, असे डॉ.हावरे यांनी सांगितले.
हे ध्यानमंदिर उभारणीसाठी अंदाजे ४० लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार असून २७०० चौ.फुट बांधकाम क्षेत्रपळ व १२५ व्यक्तींची आसन क्षमता असणार आहे. सदरच्या कामाचे कार्यादेश भानु कन्ट्रक्शन, मुंबई यांना देण्यात आलेला आहे.