Home ताज्या बातम्या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त देशात दुस-यांदा अनोखा विवाह सोहळा मोशी, पुणे ‘‘चिंच व वडाचा’’...

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त देशात दुस-यांदा अनोखा विवाह सोहळा मोशी, पुणे ‘‘चिंच व वडाचा’’ विवाह संपन्न

0

पिंपरी (6 जून 2019,प्रजेचा विकास न्युज चॅनल प्रतिनिधी) :- सर्व संत महात्म्यांना सत्याचा बोध वृक्षवेलींच्या सान्निध्यात झाला. गौतम बुद्धांना बोधीवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना भामचंद्र डोंगरावर ‘‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे’’ हा साक्षात्कार वृक्षांच्या समवेत झाला. ज्ञानेश्वर माऊलींची माता रुक्मिणीच्या संसाराची उभारणी आळंदीतील सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालताना साधू महाराजांच्या आशीर्वादाने झाली. आपल्या जवळील साधन संपत्तीचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी करावा ही प्रकृती तर त्याचा समाजासाठी उपयोग करणे ही भारतीय संस्कृति. त्याचा स्वार्थासाठी उपयोग करणे ही विकृती, श्वास उच्छवासासारखी सहजरित्या क्रिया घडते ही कृती आहे. आपल्या जवळील सर्वकाही सर्वांना समानतेने देण्याची शिकवण वृक्ष आपल्यास देतात ही पर्यावरण संस्कृति सर्वांनी जोपासून वृद्धींगत करावी, असे आवाहन हभप डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी केले.
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून मोशी प्राधिकरण सेक्टर नं. 4 येथील संतनगर मित्रमंडळ, भुगोल फाऊंडेशन, संतनगर ज्येष्ठ नागरिक संघ, इंद्रायणी सेवा संघ, संतनगर महिला मंडळ, भक्ती शक्ती संगम, संतनगर सामाजिक मंच, इंद्रायणीनगर, संतनगर सेक्टर नं. 4,6,9,11 मधील नागरिकांच्या वतीने वसुंधरेच्या संरक्षणासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने देशात दुस-यांदा अनोखा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हभप डॉ. गेठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या विवाह सोहळ्यात प्रकृती व पुरुष यांची नात आणि संदेश व सुचिता यांची कन्या ‘‘चिंच’’ तसेच ब्रह्म व माया यांचा नातू आणि संस्कृति व संस्कार यांचा चिरंजीव ‘‘वड’’ (वटवृक्ष) यांचा विवाह बुधवारी (5 जून 2019) जागतिक पर्यावरणदिनी लावण्यात आला. या विवाहाचा आंतरपाट धरण्याचा मान पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि माजी आमदार विलास लांडे -पाटील यांना देण्यात आला. विश्वास समुद्र यांनी पौरोहित्य केले. पांडुरंग सुक्रे यांनी लिहिलेल्या वृक्ष लागवड व त्याचे संगोपण करण्याबाबत जनजागृती करणा-या मंगलाष्टकांनी हा विवाह संपन्न झाला. वधुचे मामा म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, वराचे मामा म्हणून विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी जबाबदारी सांभाळली. तर कन्यादान सविता व सुरेश सुपेकर यांनी केले. वधुवरांची सजावट आणि पर्यावरणाची गवळण गाण्याचा मान मिरा गडाख, गायत्री कोलते, वैशाली कोलते, अक्षदा देगावकर, कल्पना शिनगारे, मंदा मानकर, शीतल करंजखेले यांना देण्यात आला. श्री स्वामी समर्थ केंद्राच्या साधकांनी पर्जन्यसुक्त पठण केले. या वेळी माजी महापौर मोहिनी लांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडेगिरी तसेच डॉ. महेंद्र घागरे, प्रा. लक्ष्मण वाळूंज, विक्रांत लांडे, संजय वाबळे, साहेबराव गावडे, डॉ. निलेश लोंढे, निलेश मुटके, विजय लोखंडे, भास्कर दातीर-पाटील, संजय आहेर, सुनीता बिरादार, सुनील पाटील, प्रकाश पाटील, मुकुंद रेंगे, बाळासाहेब गरूड, भास्कर दातीर-पाटील, मारुती गायकवाड, गणेश सैंदाणे, बाबूलाल चौधरी, चंद्रकांत थोरात, राजेंद्र ठाकूर, पोपट हिंगे, सिताराम वाळुंज, देहू-आळंदी देवस्थानचे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे नवचैन्यचे पदाधिकारी व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भारती डहाके यांनी लिहिलेल्या निसर्गाची मनोभावे सेवा करू, सदैव प्रदूषण टाळू, आम्ही पाणी काटकसरीने वापरू, स्वच्छतेची कास धरू, प्लास्टिकचा वापर बंद करू, भरपूर झाडे लावू व संगोपन करू, आम्ही वसुंधरेची सतत सेवा करू या सप्तपदीने चिंच व वडाची विवाहगाठ बांधुन उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यावेळी भारती डहाके यांनी ‘‘खण खण कुदळी, खोद खोद खड्डा, खड्यात लावा झाड, झाडाला घालावे पाणी, ‘वड’ माझे पती मी ‘चिंच’ त्यांची राणी’’ तसेच ‘‘छोटी छोटी पाने, सावलीत थंड गारवा, चिंचेचे झाड दारोदारी लावा’’ असे उखाणे घेऊन महिलांनी पर्यावरण जनजागृती केली.
विवाहापूर्वी वराची स्वरसंगम ब्रास बॅण्ड यांनी परिसरात वाजतगाजत मिरवणूक काढली. यावेळी ग्लोबल वॉर्मिंगची लागली चाहूल, प्रदूषण करण्याची करू नका भूल, धरणीमातेवर पसरवू वनराईची झूल, वसुंधरेच्या चरणी वाहतो प्रयत्नांचे फूल, झाडांना नका करू नष्ट; नाहीतर श्वास घ्यायला होतील कष्ट, बचत पाण्याची गरज काळाची, स्वच्छता म्हणजे रोजचा सण; नाहीतर कायमचे आजारपण, सफाई करा रोज; घाणीचा प्रॉब्लेम क्लोज, पृथ्वीवर माणूसच एक असा प्राणी आहे जो झाडे लावू शकतो. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवाल तरच तुम्ही वाचाल… असे जनजागृतीचे फलक घेऊन मोगरा, जाई-जुई, निशिगंधा-चमेली, गुलाब, रातराणी, सदाफुले हा किलबिल परिवार पारंपारिक पोशाखात सहभागी झाला होता. या वेळी नागरिकांनी आहेर म्हणून आयुर्वेदिक वृक्षांची रोपे, कुदळ, फावडे, टिकाव, घमेले, खुरपे, बादली, खत, सिडबॉल, चंदनाची रोपे, चंदन बी दिले. त्याचा स्विकार संयोजक विठ्ठल वाळूंज यांनी केला. लायन्स क्लब पुणे नवचैतन्य यांनी उपस्थितांना चंदन बियांचे वाटप केले. संयोजकांच्या वतीने जमा झालेली आहेरातील रोपे परिसरातील सोसायट्यांमध्ये लागवडीसाठी वाटप करण्यात आले.
या अनोख्या विवाह सोहळ्याच्या संयोजनात पिंपरी चिंचवड मनपा उद्यान विभाग, इंद्रायणी सेवा संघ, पर्यावरण मित्र, हरीत सेना, पतंजली योग समिती, साद प्रतिष्ठान, अविरत श्रमदान, वृक्ष सायकल मित्र, आर्ट ऑफ लिव्हिंग, निसर्ग सायकल मित्र ग्रुप, वसुंधरा फाऊंडेशन, स्वाध्याय परिवार, ईसीए, लायन्स क्लब पुणे नवचैतन्य, डी.वाय.पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पिंपरी, निसर्गराजा मित्र जिवांचे, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पर्यावरण विभाग या संस्थांनी सहभाग घेतला होता. उपस्थितांचे स्वागत संयोजक विठ्ठल वाळूंज यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले, आभार अनिल घाडगे यांनी मानले.


NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 14 =

error: Content is protected !!
Exit mobile version