Home ताज्या बातम्या भाजपला पिंपरीत मोठा धक्का : कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद अखेर रद्द,लवकरच पोटनिवडणुकीची...

भाजपला पिंपरीत मोठा धक्का : कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद अखेर रद्द,लवकरच पोटनिवडणुकीची दाट शक्यता

0

पिंपरी(प्रजेचा विकास न्युज प्रतीनीधी)-पिंपरी चिंचवड महापालिकेचे चिखलीतील प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव जागेवरून निवडून आलेले भाजप नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे नगरसेवकपद अखेर रद्द झाले आहे. जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का समजला जात असून चिखलीत या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे.
कुंदन गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक १ मधील अ या अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर विजय मिळवला आहे. मात्र, गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी नितीन रोकडे यांनी त्यांटे अनुसूचित जातीत मोडत नसल्याची हरकत जात पडताळणी समितीपुढे घेतली होती. त्यानुसार त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले. नंतर बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या या निर्णयाविरोधात गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाने गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबर २०१८ पर्यंत स्थगिती आदेश दिले होते. त्यामुळे गायकवाड यांना दिलासा मिळाला होता. परंतु, ही मुदत संपताच बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने २९ सप्टेंबर २०१८ रोजी कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा अंतिम निकाल दिला आहे. रोकडे यांच्या वतीने अॅड. सुनील माने यांनी या प्रकरणात काम पाहिले.
त्याबरोबर त्यांना अनुसूचित जातीचे दिलेले फायदे तत्काळ काढून घेण्याचे आदेशही दिले होते. त्याचप्रमाणे गायकवाड यांनी बनावट कागदपत्रे सादर करून जात पडताळणी समितीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशही दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकांना दिले होते. तसा अहवाल महापालिका निवडणूक विभागाने राज्य शासनाला पाठविला होता. त्यावर शासनाने शुक्रवारी (दि.५) सायंकाळी गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला. त्याप्रमाणे आयुक्त हर्डीकर यांनी नगरसेवकपद रद्द करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे गायकवाड यांच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर म्हणाले की, “बुलढाणा जात पडताळणी समितीने नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे यांचे जात प्रमाणपत्र रद्द रद्द केले आहे. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि.5) महापालिकेला प्राप्त झाला. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद्द रद्द केले आहे. या आदेशाची प्रत गायकवाड, नगरविकास विभाग, राज्य निवडणूक आयोग आणि पालिकेच्या नगरसचिव विभागाला पाठविली आहे”.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + nine =

error: Content is protected !!
Exit mobile version