(पिंपरी)-पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील धर्मादाय रुग्णालयाअंर्तगत आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी टाळाटाळ करु लागले आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण मुजोर प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे दगावू लागले आहेत. त्याच्या निषेधार्थ धर्मादाय रुग्णालय संघर्ष समितीच्या वतीने थेरगांवच्या आदित्य बिर्ला रुग्णालयासमोर आज (गुरुवारी) धरणे आंदोलन करुन रुग्णांलयावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अजय लोंढे, अजिज शेख, अमोल उबाळे, संगिता शहा, भारत मिरपगारे, भीमराव तुरुकमारे, रिपाइंचे अजिज शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी शहरातील धर्मादाय रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय रुग्णालय असा स्पष्ट उल्लेख करावा, रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर स्वतंत्र आॅफीस व सोशल वर्कर चोवीस तास उपलब्ध ठेवण्यात यावा, निर्धन आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीत उपचार सेवा द्यावी, निर्धन आर्थिक दुर्बल घटकातील व योजनांच्या सेवा सुविधांचा आयपीएफ माहिती फलक दररोज स्पष्ट लिहिण्यात यावा, धर्मादाय योजनेतून लाभ घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला आवश्यक कागदपत्रे पुर्तता, नियम अटीचा सुचना फलक दर्शनी भागात प्रवेशद्वारावर लावण्यात यावा, रुग्णाला उपचार सेवा सुविधा देणे कामी रुग्णालयाची समस्या ही रुग्ण व नातेवाईकांना स्पष्ट लेखी स्वरुपात देण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी बिर्ला रुग्णालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आर्दित्य बिर्ला रुग्णालयातील गलथान कारभार आणि मुजोर प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच आंदोलकांनी रुग्णांना उपचार करण्यासाठी नकार देणा-या रुग्णालयाच्या प्रशासनावर फाैजदारी दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली. याबाबत पुणे जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्तांना आंदोलकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.