बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी हात मिळवणी करणारे शिरूर नगरपंचायतीचे नगरसेवक भिमराव गायकवाड यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्याचबरोबर नगरसेविका आशा शिंदे यांच्याविरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकार्यांनी फेटाळले असल्यामुळे धनंजय मुंडे यांना माजी मंत्री सुरेश धस यांच्याकडून हा जोरदार धक्का समजला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येत्या २१ मे रोजी तर शिरूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी २५ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यासह शिरूरमध्येही राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. एकूण १७ सदस्यांची शिरूर नगर पंचायत असून त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (धस गटाचे) १०, भाजपचे ६ आणि १ अपक्ष (धस गट) असे १७ उमेदवार निवडूण आले आहेत. पण राष्ट्रवादीचे ७, १ अपक्ष आणि भाजपचा १ अशा ९ सदस्यांनी मागच्या तीन महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जाण्यास समाधान मानले.
धस गटाचे विनोद मारूती इंगोले यांनी चौथ्या अपत्याचे कारण पुढे करत धनंजय मुंडे गटाचे नगरसेवक भिमराव देवराव गायकवाड यांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्यानुसार विरोधकांनीही धस गटाच्या नगरसेवक आशा सुनिल शिंदे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले. त्यांच्यावर अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आला होता, याबरोबरच भाजपचे रावसाहेब हरिभाऊ ढाकणे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या गटातील नगरसेवक ज्ञानेश्वर उटे यांच्या विरोधातही आपील दाखल केलेले आहे. अतिक्रमणाचा ठपका त्यांच्यावरही ठेवण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकारी एम.देवेंद्रर सिंह यांनी गुरूवारी यातील दोन प्रकरणांचा निकाल दिला. नगरसेवक भिमराव गायकवाड यांना यामध्ये अपात्र ठरवण्यात आले, तर नगरसेवक आशा शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकार्यांनी फेटाळल्यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का समजला जात आहे.