पुणे, दि. ३ : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे, पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेचे पर्यावरण विभागप्रमुख प्रा. अमित मल्लिक, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमपीएमएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते
श्री. राव म्हणाले की, अतिरिक्त कार्बन उत्सर्जनामुळे गंभीर स्वरूपाच्या पर्यावरणीय हानीपासून पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्ष काळाची गरज असल्यामुळे स्वयंस्फूर्तीने हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कार्बनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कार्बन स्थिरीकरणाच्या महत्वाविषयी जनजागृती करणे, हा या कक्ष स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीपासून या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली जाणार असून हा प्रकल्प यापुढे कार्बन स्थिरीकरणासाठी संपूर्ण पुणे विभागात राबविण्यात येणार असल्याचेही श्री. राव म्हणाले.
या कक्षाचे सनियंत्रण सहआयुक्त पूनम मेहता आणि उपायुक्त विजय मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन विभागाद्वारे करण्यात येणार आहे.